सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाच्या कालव्याला अनधिकृतपणे भगदाड पाडून पाइपलाइनद्वारे सायपन पद्धतीने पाणी वळवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सिंचनाच्या पाणीपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शासनाच्या सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सुशांत अशोक शेलार, (रा. वडगाव रासाई, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्राजक्ता विठ्ठल वाठे (वय २९, रा. भिवरी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
सदरची घटना दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वडगाव रासाई गावच्या हद्दीत सुशांत शेलार यांच्या शेताजवळ घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुर्व परवानगी न घेता कालव्याला छेद…
फिर्यादीत नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोपीने पाटबंधारे उपविभाग, शिरुर यांची कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी घेतली नव्हती. तरीही कालव्याला चुकीच्या पद्धतीने छेद देऊन पाइपलाइन सायपन बसविण्यात आल्याचा आरोप आहे. या सायपनद्वारे कालव्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून अनधिकृतरीत्या पाण्याचा वापर करण्यात आला. या कृतीमुळे कालव्याची रचना खराब झाली असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आले.
सिंचन व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता
कालवा फोडून पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच कालव्याच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकारामुळे शासनाच्या मालकीच्या कालव्याचे अंदाजे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.
विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल…
या प्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र सिंचन अधिनियम तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियमातील कलमा अन्वये कारवाई करण्यात आली आहे. शिरुर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गवळी या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.
कालव्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे शिरुर तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या कालव्यांची सुरक्षा, अनधिकृत पाइपलाइन आणि बेकायदेशीर पाणीउपशाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. कालवे अनधिकृतपणे फोडणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच पाटबंधारे विभागाने नियमित पाहणी मोहीम राबवावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…
परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…
पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…
निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…