आंबा बागेमध्ये मोहर येणे आणि आल्यानंतर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. कोकणामध्ये हापूसच्या मोहोराचे नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरतो. उर्वरित राज्यामध्ये केसरसह अन्य आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असून, त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असतो. या बाबी लक्षात घेऊन आपल्या भागामध्ये मोहोर संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते.
राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागामध्ये अतिघन पद्धतीने केसर आंबा लागवड वाढलेली आहे. ही जात थंडीच्या तीव्रतेच्या प्रमाणात १५ डिसेंबरपासून १५ जानेवारीपर्यंत मोहरून येते. ज्या शेतकऱ्यांनी वाढ नियंत्रकांचा वापर जुलै ऑगस्टमध्ये केलेला आहे, त्यांच्या बागांमध्ये अगदी लवकर म्हणजे १५ नोव्हेंबरलाच मोहर निघण्यास सुरुवात झाली असेल. नोव्हेंबरअखेर पूर्ण मोहर बाहेर पडला असेल. या वर्षी अगदी ऑक्टोवर अखेरपासूनच थोड्याफार प्रमाणात बागा मोहरण्यास सुरुवात झाली. केसर आंबा हंगामाच्या आधीच (म्हणजे १५-२० मार्चपासून बाजारात येण्यास सुरू होईल. परिणामी त्याला प्रिमियम दर मिळू शकेल, ही आशा आहे.
पूर्वी हाच आंबा २०-२५ मे दरम्यान काढणीस येत असलेला आंबा आता साधारणतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढणीपर्यंत आलेला असेल.
सर्वात आनंदाची बाव म्हणजे गेल्या पाच सात वर्षात भारतीय केसर आंबा हा अन्य कोणत्याही वाणाच्या तुलनेत अमेरिका आणि जपान सारख्या चोखंदळ देशांमधील लोकांच्या पसंतीस येत आहे. या वर्षीही मोहर लवकर सुरू होऊन बागा उत्तम प्रकारे मोहरल्यामुळे शेतकऱ्यामध्येही आनंदाचे वातावरण असल्याचे माझ्या विदर्भ, सोलापूर व धाराशीव भागातील दौऱ्यात दिसून आले. फक्त आता हा मोहर टिकवून त्याचे फळामध्ये रूपांतर होईपर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. कारण कोकणामध्ये आर्द्रता अधिक आणि तापमान मध्यम असल्याने तुडतुडे ही कीड आणि करपा या रोगाचा अधिक प्रादुर्भाव दिसतो. उर्वरित राज्यामध्ये तुलनेने कोरडे हवामान असल्याने थंडी जास्त राहते. परिणामी तुडतुडे आणि करपा रोगाच्या प्रादुर्भावाऐवजी भुरीचा धोका सर्वाधिक राहतो. मात्र या वर्षी बहुतांश भागामध्ये पाऊस अधिक व शेवटपर्यंत झालेला असल्याने आर्द्रता वऱ्यापैकी असेल. त्यामुळे या वर्षी उर्वरित राज्यामधील आंबा बागांमध्ये काही प्रमाणात तुडतुडे आणि करपा या रोगाचा प्रादुर्भाव राहू शकतो, हे लक्षात घेऊन पीक संरक्षणाचे वेळापत्रक आखावे लागेल.
१) भुरी
रोगकारक बुरशी: उडीयम मॅन्जीफेरा
प्रामुख्याने आंबा झाडावर आलेल्या मोहोराला या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोहोर आणि कच्च्या फळांची गळ होते. भारतात या रोगामुळे आंबा बागेचे २२-३५ टक्के (काही परिस्थितीत अगदी ९० टक्क्यांपर्यंत) नुकसान होत असल्याची नोंद आहे.
लक्षणे: या रोगामुळे मोहरावर पांढरी राखट रंगाची बुरशी येऊन तो गळू लागतो. त्यातही मोहातील फुलाच्या पाकळ्यांपेक्षा फुलाच्या दलावर या रोगाचा अधिक परिणाम होतो. मोहरातील फुले न उमलताच गळून पडतात.. पानावर प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या दोन्ही बाजूला छोटे छोटे राखाडी रंगाचे ठिपके दिसून येतात. ते पानाच्या खालील बाजूने अधिक ठळक असतात. लहान आकाराच्या फळावर प्रादुर्भाव झाल्यास फळे पिवळी पडून गळतात.
अनुकूल वातावरण: वातावरणात ६० ते ८४ टक्क्याच्या आसपासची आर्द्रता, १५ ते ३० अंश सेल्शिअसच्या आसपास तापमान आणि सतत ३ ते ४ दिवस अतिशय वेगाने वाहणारे वारे या मुळे या रोगाच्या प्रादुर्भाव आणि प्रसारास कारणीभूत ठरू शकते.
प्रतिबंधात्मक उपाय: रोगग्रस्त पाने, मोहोर आणि फुले झाडावरून काढून नष्ट करणे हा प्रतिबंधात्मक उपाय करता येतो. सोवत झाडाला मोहोर येण्याच्या कालावधीत वेळापत्रकात दाखविल्याप्रमाणे फवारण्यांचे नियोजन करावे.
२) करपा
रोगकारक बुरशी: कोलेटोट्रायकम ग्ल्यूयोस्पोरीऑइडस या रोगाच्या प्रादुर्भावामुळे ३९ टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
लक्षणे: आर्द्र वातावरणात या बुरशीची वाढ झपाट्याने होऊन फांद्यावरील मोहर करपणे, फांद्यांचे शेंडे जळणे, डहाळ्या वाळणे, पाने करपणे यासारखी लक्षणे दिसायला लागतात. जुन्या पानापेक्षा नवीन पानावर-या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. मोहरामधील फुलाच्या देठावर व फुलावरही छोटे विटकरी काळे डाग पडतात. पुढे हे डाग वाढून मोठे होतात. परिणामी मोहर काळा पडून गळायला लागतो. फळावरही सुरुवातीला बारीक गोल काळे डाग पडतात. नंतर हे डाग एकत्र होत एकच करड्या रंगाचा मोठा आणि अनियमित आकाराचा डाग पडलेला दिसतो.
अनुकूल वातावरण: अधिक आर्द्रता असलेले अनुकूल वातावरण तयार होताच या बुरशीचे बीज तयार होते. हे वीज आंवा मोहोरावर प्रादुर्भाव करते. बारा तासाहून अधिक काळ वातावरणात ९५ टक्के सापेक्ष आर्द्रता व २५ अंश सेल्सिअस च्या आसपास तापमान या सोवत सकाळी पडणारे धुके किंवा दव असे वातावरण या बुरशीसाठी लाभदायक ठरते.
प्रतिबंधात्मक उपाय: रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी. झाडाखाली पडलेल्या रोगग्रस्त फांद्या, फळे गोळा करून नष्ट करावीत.
३) तुडतुडे: आंबा झाडाची पाने, मोहर आणि फळांवर ही कीड रसशोषण करते. तिने खरडवल्यामुळे फळावर डाग दिसतात. तुडतुडे पाचरीसारखे, दोन मि.मी. लांबीचे, भुरकट तपकिरी रंगाचे अशतात. त्यांच्या डोक्यावर तांबड्या रंगाचे तीन ठिपके असून, चाल तिरकी व चपळ असते. या किड्याची साधारणपणे पंधरा दिवसात पूर्ण वाढ होऊन प्रौढामध्ये रूपांतर होते. पिल्लांसह प्रौढांचे मुख्य अन्न पाना फुलातील रस असतो. या किडीच्या रस शोषणाने पानावर फारसे परिणाम दिसत नसले तरी आंब्याचा मोहोर मात्र सुकून गळून जातो. याचा प्रत्यक्ष परिणाम फळधारणेवर होतो. तुडतुडे वर्षभर आंब्याच्या झाडावरच राहत असले तरी मोहरल्यावर त्यांचे गंभीर परिणाम दिसतात. म्हणून झाडांना मोहर येण्याआधीच त्यांच्या नियंत्रणाचे उपाय करणे गरजेचे असते.
आंबा मोहोर संरक्षणाचे वेळापत्रक
१) फवारणीची वेळ: मोहोर दिसण्याच्या १५ दिवस आधी
L
कीडनाशक प्रमाण प्रती १० लिटर पाणी: लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १० मि.लि किंवा ॲझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) ५ मि.लि.
शेरा: खोडावर, फांद्यावर व पानांवर सर्वत्र कव्हग्रेज होईल, अशी फवारणी करावी.
2) फवारणीची वेळ: पहिल्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी म्हणजे डोळे फुटताच खोड, फांद्या व झाडावर
कीडनाशक प्रमाण प्रती १० लिटर पाणी: गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम अधिक थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ३ ग्रॅम
शेरा: यामुळे भुरी रोग आणि तुडतुड्याचे नियंत्रण होईल.
३) फवारणीची वेळ: दुसऱ्या फवारणीनंतर सुमारे दोन आठवड्यांनी
कीडनाशक प्रमाण प्रती १० लिटर पाणी: गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बुरशीनाशक) अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) ३ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ३ मि.लि.
शेरा: मोहोर उमलण्याच्या काळात बुरशीनाशक फवारावे. मात्र कीडनाशक वापरणे टाळून कडूनिंब अर्काचा वापर करावा. कारण कीडनाशकाचा मधमाश्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
४) फवारणीची वेळ: तिसऱ्या फवारणीनंतर सुमारे दोन आठवड्यांनी
कीडनाशक प्रमाण प्रती १० लिटर पाणी: गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बुरशीनाशक) अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) ३ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १५ मि.लि.
शेरा: केसर आंबा बागेमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक हानिकारक असून, तुडतुडे तुलनेने कमी असतात. त्यामुळे केसर आंबा उत्पादकांचा मुख्य भर हा भुरी रोगाच्या नियंत्रणावर असावा.
5) फवारणीची वेळ: चौथ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी
कीडनाशक प्रमाण प्रती १० लिटर पाणी: गंधक २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बुरशीनाशक) अधिक बुप्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि. किंवा थायामिथोक्झाम (२५ डब्ल्यूपी) ५मि.लि.
शेरा: गरज भासल्यास
6) फवारणीची वेळ: पाचव्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी
कीडनाशक प्रमाण प्रती १० लिटर पाणी: गंधक (पाण्यात मिसळणारे) २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल ५ मि.लि. (यापैकी एक बरशीनाशक) अधिक डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के ईसी ५ मि.लि.
शेरा: गरज भासल्यास
प्रत्येक फवारणीमध्ये शक्यतोवर तेच ते बुरशीनाशक किंवा कीडनाशक घेण्याच्या ऐवजी प्रत्येक वेळी बदलत जावे. मध्येच एखादे वेळेस ढगाळ वातावरण असले किंवा पाऊस पडला तर एखादी फवारणी जास्तीची घ्यावी
1) फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.
2) खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.
3) बॅन किंवा रेस्ट्रिक्टेड आहे का पाहावे.
4) लेबल क्लेम वाचावेत.
5) पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.
6) रसायनांचा गट तपासावा.
7) पीएचआय, एमआरएल तपासावेत.
8) पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.
9) मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा.
10) पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.
(सोशल मीडियावरून साभार)
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…