आपला डोळा एखाद्या कॅमेर्यासारखाच असतो. त्यामुळे त्यावर पडणाऱ्या प्रकाशाचं केंद्रीकरण करून ते त्याच्या पाठी असलेल्या पडद्यावर पाडणं आवश्यक असतं. तसं झालं तरच आपण पाहत असलेल्या वस्तूची स्पष्ट आणि स्वच्छ प्रतिमा पडद्यावर उमटते. हे करण्यासाठी आपल्या डोळ्यात एक भिंग असतं. ते पारदर्शक असतं. त्यामुळेच त्यावर पडणारा प्रकाश आरपार जाऊ शकतो. हे भिंग पाण्यासारखा द्रवपदार्थ आणि प्रथिनं यांचं मिळून बनलेलं असतं. पण त्यातील प्रथिनांच्या रेणूंची रचना त्याचं पारदर्शकत्व टिकून राहील अशा प्रकारेच केलेली असते.
उतारवयात मात्र यातल्या प्रथिनांच्या गुठळ्या होतात. तसं झालं की ते भिंग गढूळतं. ते पूर्वीसारखं पारदर्शक राहत नाही. या गुठळ्या आकारानं लहान असतील किंवा संख्येनं जास्त नसतील तर भिंगातून प्रकाश पूर्वीसारखाच आरपार जाऊ शकतो. मात्र त्या गुठळ्यांकडुन तो विखुरलाही जात असल्यामुळे वस्तूची प्रतिमा स्पष्ट पडत नाही. ती धूसर होते. तसंच त्या गुठळ्यांमुळे भिंगाचा रंगही काही वेळा बदलतो. पिवळसर होतो. त्यामुळे त्या प्रतिमेतील रंगही फिकुटतात किंवा त्यांच्यात बदल होतो.
डोळ्यावर पडणारा प्रकाश आहे त्यापेक्षा अधिक प्रखर वाटतो. तो सहन होत नाही. काही वेळा समोरच्या वस्तूभोवती प्रकाशाचं वलय असल्यासारखंही दिसतं. डोळ्यातल्या भिंगांची पारदर्शकता कमी किंवा नाहीशी होणे यालाच मोतीबिंदू होणं किंवा डोळ्यात फुल पडणं असं म्हटलं जातं. मोतीबिंदू हा वाढत्या वयातला विकार असला तरी काही वेळा डोळ्यांना झालेल्या इजेची परिणतीही मोतीबिंदूत होऊ शकते. डोळ्यांवर जंबूपार म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणांचा मारा झाला असेल तर मोतीबिंदू होऊ शकतो. काही वेळा जनुकांमधील काही दोषांमुळे उपजतच मोतीबिंदू झालेला असतो. जन्माच्या वेळी त्याची व्याप्ती फारशी नसते; पण पुढं त्याचीच वाढ होऊन भिंग आपलं काम करेनासं होतं. मधुमेहाची बाधा झालेली असेल किंवा अतिरेकी धूम्रपान होत असेल तरी मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढीस लागते.
यावर उपाय म्हणून ते गढुळलेलं भिंग काढुन टाकणं आवश्यक असतं. पूर्वीच्या काळी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेत हेच केलं जात असे. त्यापायी प्रकाशाच्या पडद्यापर्यंतच्या प्रवासात येणारा अडथळा दूर झाला तरी तो प्रकाश केंद्रित करण्याचं काम होऊ शकत नसे. त्यामुळे मग बाहेरून जाड भिंगाचा चष्मा देऊन ती त्रुटी नाहीशी करावी लागत असे. परंतु आता त्या काढून टाकलेल्या भिंगाच्या जागी कृत्रिम भिंग बसवता येतं. डोळ्याच्या आकारानुसार तसंच त्याच्या इतर गुणधर्मांनुसार योग्य ते भिंग निवडता येतं. गढुळलेलं भिंग काढुन टाकण्याची शस्त्रक्रिया करतानाच या कृत्रिम भिंगाचं रोपण केलं जातं. ते स्वयंचलितरित्या आपल्या जागी जाऊन बसेल याचीही व्यवस्था केलेली असते. हे भिंग नैसर्गिक भिंगाच्या क्षमतेनेच आपलं काम करतं. त्यामुळं गढुळलेली नजर परत साफ होऊन स्पष्ट आणि स्वच्छ प्रतिमा उमटते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…