मुंबई: मुंबईत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिलेली २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रे एक महिन्याच्या आत ताब्यात घेण्याचे आदेश रितू तावडे यांनी दिले. तसेच शहरातील फेरीवाल्यांच्या जन्मप्रमाणपत्रांसह इतर कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर संजय घाडी, भाजपचे गटनेते गणेश खणकर, माजी खासदार किरीट सोमय्या, नगरसेवक निल सोमय्या, प्रकाश गंगाधरे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच तहसीलदार, परवाना विभाग व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
२३७ प्रमाणपत्रे पोर्टलवर रद्द
उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी २३७ जन्मप्रमाणपत्रे पोर्टलवर रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, अवैधरित्या प्रमाणपत्रे वितरित करणाऱ्या संबंधित डॉक्टर व आरोग्य अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. आतापर्यंत ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरितांवर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.
विलंबित प्रकरणांमध्ये २१ दिवसांनंतर दिलेल्या जन्मप्रमाणपत्रांची फेरचौकशी करण्याची मागणीही महापौरांनी केली. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून १ जानेवारी २०१६ नंतरची सर्व कागदपत्रे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची तपासणी
शहरातील फेरीवाल्यांची नोंद, परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्यासंदर्भातील कागदपत्रांची तात्काळ पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. आधार कार्ड व इतर शासकीय ओळखपत्रांची काटेकोर तपासणी करून अवैध कागदपत्रे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी महानगरपालिका व पोलीस विभागात समन्वय वाढवण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांत शहरात फेरीवाल्यांची संख्या वाढली असून त्यामध्ये परदेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्यास राहून व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे महापौरांनी नमूद केले. अतिक्रमण, फुटपाथवरील गर्दी आणि अनधिकृत व्यवसायामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही बोगस जन्मप्रमाणपत्रे ताब्यात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. विविध प्रभागांमध्ये तत्काळ कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…