महाराष्ट्र

अजित पवारांनंतर सत्ता-संघर्ष टोकाला! सुनेत्रा पवारांची एंट्री पण अर्थखात्याला भाजपचा ‘नकार’

अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तबाची शक्यता, अर्थखात्यावर भाजपचा दावा

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जागा कोण घेणार आणि महत्त्वाचे अर्थखाते कुणाकडे जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या (शुक्रवारी) मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असून, त्या उद्याच संध्याकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल, त्या निर्णयामागे भारतीय जनता पक्ष ठामपणे उभा राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्याकडील अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यास भाजप तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून अजित पवार यांच्याकडील खाती पक्षाकडेच ठेवण्यात यावीत, अशी विनंती केली होती. मात्र अर्थखात्याच्या बाबतीत राष्ट्रवादीची ही अट भाजपला मान्य नसल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचा आणि नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पक्षांतर्गत विविध मतप्रवाह समोर येत असतानाच सुनेत्रा पवार यांनी धीटपणे पुढे येत उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे समजते.

राजकीय वर्तुळात अर्थखात्याला विशेष महत्त्व दिले जाते. आतापर्यंत ज्या पक्षाकडे अर्थखाते राहिले, त्या पक्षाला सरकारमध्ये वेगळीच ताकद मिळाल्याचा अनुभव आहे. अजित पवार यांनी महाविकास आघाडी तसेच महायुती सरकारमध्येही आग्रह धरून अर्थखाते स्वतःकडे ठेवले होते. भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होतानाही त्यांनी अर्थखाते आणि पुण्याचे पालकमंत्रिपद आपल्या अटींवर घेतले होते.

मात्र आता अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादीकडे अर्थखाते न ठेवता ते भाजपकडेच राहणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार, हा प्रश्न उपस्थित झाला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे याचे उत्तर दिले आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचे बहुतांश काम पूर्ण केले होते, उर्वरित कामात मी स्वतः लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करेन, असे सांगत फडणवीस यांनी अर्थसंकल्प स्वतः मांडण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे अर्थखातेही भाजपकडेच राहणार, अशी चर्चा अधिक बळावली आहे.

एकूणच अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत उपमुख्यमंत्रिपद, अर्थखाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य याबाबत पुढील २४ तास राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

2 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

8 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

8 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

8 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

8 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago