औरंगाबाद: “मराठी असे मायबोली आमुची…” या ओळींनी सुरू होणारा मराठी अस्मितेचा स्वर आज पुन्हा एकदा घुमला तो मराठी भाषा दिनानिमित्त. २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून राज्यभर साजरा केला जात असताना, केवळ एक दिवसापुरता उत्सव न राहता मराठीचा सन्मान वर्षाचे बारा महिने जपला जावा, अशी भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.
हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांच्या ‘कणा’ या कवितेतील स्वाभिमान, संघर्ष आणि ताठ कण्याचा संदेश आजही सामान्य माणसाला लढण्याची प्रेरणा देतो. “पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा!” हा संदेश आजच्या काळात अधिकच अर्थपूर्ण ठरतो आहे.
दिखाव्यापेक्षा कृतीला प्राधान्य हवे
मराठी भाषा दिनानिमित्त कविता वाचन, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. मात्र, मराठीचा सन्मान केवळ व्यासपीठावरच्या भाषणांपुरता मर्यादित न राहता व्यवहारात उतरला पाहिजे, अशी मागणी मराठीप्रेमींनी व्यक्त केली आहे.
“खोट्या अस्मितांच्या घोषणा देणाऱ्यांपेक्षा शांतपणे काम करणारे कर्मयोगीच खरे मराठीचे वाहक आहेत,” असा सूर यावेळी उमटला. संत परंपरेतील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा आणि संत जनाबाई यांचा उल्लेख करत ‘कामातच देव’ पाहण्याची वृत्ती आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
स्वाभिमान आणि संघर्षाची परंपरा
मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा इतिहास सांगताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची आठवण करून देण्यात आली. “सहन करायचं ज्ञानेश्वर माऊलींसारखं, पण अन्यायाविरुद्ध लढायचं शिवरायांसारखं,” असा संदेश देण्यात आला.
आजच्या काळात मराठी भाषेचा वापर कमी होत चालल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. सामाजिक प्रतिष्ठा ही भाषा, संस्कृती किंवा गुणवत्तेऐवजी दिखाव्यावर मोजली जात असल्याचे चित्र बदलण्याची गरज व्यक्त झाली.
‘मराठी हा रक्तातला अभिमान असावा’
मराठी भाषा दिन हा केवळ ‘इव्हेंट’ न ठरता मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान प्रत्येकाच्या आचरणात दिसला पाहिजे, असा ठाम सूर व्यक्त करण्यात आला. मराठी माणसाने आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासाने पुढे जाताना आपल्या मातृभाषेचा झेंडा हृदयात फडकत ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.
“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” हे ब्रीद केवळ घोषवाक्य न राहता आचरणात उतरवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मराठी आमची आन, आमची शान…
मोडू पण वाकणार नाही — पण व्यवहारात मराठी जपू, वाढवू आणि अभिमानाने जगू!
शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…
मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…
नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…