महाराष्ट्र

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह नव्या धोक्यांबाबत जनजागृती

मुंबई : ऑनलाइन व्यवहार, सोशल मीडिया आणि डिजिटल सेवांचा वापर शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्ह्यांचे स्वरूपही दिवसेंदिवस बदलत आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल जनजागृती आणि डिजिटल स्वच्छता हीच भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांच्या संरक्षणाची प्रभावी ‘फायरवॉल’ ठरू शकते, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया (DSCI) अंतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती महिना २०२६ निमित्त देशव्यापी ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (बीएसई) ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेत नागरिकांना दैनंदिन ऑनलाइन व्यवहारांमध्ये सुरक्षित सवयी अंगीकारण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीसह नव्या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती केली जाणार आहे.

मंत्री शेलार म्हणाले की, निवृत्तिवेतनधारक, गुंतवणूकदार, ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी, डिजिटल उपकरणे वापरणाऱ्या माता आणि ई-स्पोर्ट्स खेळाडू अशा प्रत्येक घटकाने ऑनलाइन सुरक्षेची आवश्यक खबरदारी समजून घेणे गरजेचे आहे. नागरिकांपर्यंत सोप्या आणि व्यवहार्य भाषेत सुरक्षाविषयक संदेश पोहोचविणारी ही बहुघटक मोहीम कुटुंबे, व्यवसाय आणि समुदायांच्या सायबर सुरक्षेला बळकटी देईल.सायबर क्षेत्रातील सामूहिक प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासन उद्योग क्षेत्रासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे. सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब नसून नागरिकांचा सजग सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एआयमुळे बदलताहेत सायबर गुन्ह्यांचे स्वरूप

माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी बदलत्या सायबर धोक्यांबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नागरिकांना लक्ष्य करणारे सायबर धोके वेगाने बदलत आहेत. त्यामुळे केवळ तांत्रिक सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसून प्रत्येक व्यक्तीने सतर्क आणि माहितीपूर्ण राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’सारख्या मोहिमांमधून डिजिटल धोक्यांचे स्वरूप सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासह नागरिकांना व्यवहार्य सुरक्षा सवयी अंगीकारण्यासाठी सक्षम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ने मोहिमेला सुरुवात

ऑक्टोबर महिना जगभरात सायबर सुरक्षा जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी बीएसईच्या पारंपरिक घंटानादाच्या धर्तीवर ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ हा प्रतीकात्मक उपक्रम राबविण्यात आला. यातून सुरक्षित सायबर अवकाशासाठी शासन आणि उद्योग क्षेत्राची सामूहिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली. यावेळी मोहिमेच्या ‘सायबर अँथम’चेही अनावरण करण्यात आले.

डिजिटल अटक ते रिअल टाइम डीपफेक; नव्या फसवणुकींपासून सावधान

भारतीय पारंपरिक कठपुतळी कथाकथन कलेचा डिजिटल युगातील सायबर जनजागृतीसाठी वापर करण्यात आला आहे. नागरिकांना संदेश सहज समजावेत, लक्षात राहावेत आणि त्यांनी ते इतरांपर्यंत पोहोचवावेत, या उद्देशाने मोहिमेची रचना करण्यात आली आहे.

या माध्यमातून मोबाइल ॲप, ई-मेल, समाजमाध्यमे आणि डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षित सवयींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर एपीके फसवणूक, एआय व्हॉइस क्लोनिंग, रिअल टाइम डीपफेक, ‘डिजिटल अटक’, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फसवणूक तसेच अन्य उदयोन्मुख सायबर धोक्यांविषयी नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.स्क्रीनसेव्हर्स मंच, पोस्टर चौपाल, माहितीचित्रे, सायबर कथा, स्टिकर्स आणि ‘सायबर पाठशाला की किताब’ यांसारख्या माध्यमांतून जनजागृती साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या मोहिमेला CERT-In, I4C, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि बीएसईसह विविध उद्योग भागीदारांचे सहकार्य लाभले आहे. डीएससीआयचे संचालक सुकृत घोष यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, बीएसई, सेबी, I4C यांच्यासह १७ औद्योगिक भागीदार संस्थांचे प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

58 मिनिटे ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

5 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

5 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

5 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

5 तास ago

दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर

नागपूर, वर्धा, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी साधणार संवाद मुंबई: महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा…

5 तास ago