मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज मुंबईत सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या वतीने वरळी डोम येथे भव्य शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अचानकच अजितदादांना श्रद्धांजली द्यायची वेळ येईल असे कधी वाटले नव्हते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोठे आहे. राज्याच्या इतिहासात आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे अजितदादा.” त्यांनी दादांच्या आर्थिक शिस्तीचा, अभ्यासू वृत्तीचा आणि मंत्रिमंडळातील परखड भूमिकेचा विशेष उल्लेख केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “एक स्पष्ट वक्ता, परखड मत मांडणारा आणि राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेला नेता आज आपल्यात नाही. आपल्या घरातील कुणीतरी गेल्याची भावना संपूर्ण राज्य अनुभवत आहे.” दादांच्या कामातील तडजोड न करण्याच्या स्वभावाचा त्यांनी उल्लेख केला.
ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भावनिक शब्दांत दादांना श्रद्धांजली अर्पण केली. “दादा, तुम्ही दिलेला शब्द पाळला. वेळ पाळणारे तुम्ही, मग आता अवेळी कसे गेलात?” असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला. “ज्या वटवृक्षाच्या छायेत आपण वाढतो, तोच वटवृक्ष उन्मळून पडल्यावर त्याचे महत्त्व कळते,” असेही ते म्हणाले.
जयंत पाटील यांनी दादांसोबतच्या ३८ वर्षांच्या सहवासाच्या आठवणींना उजाळा दिला. “खुल्या आणि दिलदार मनाचा नेता, ठाम मत व्यक्त करणारा सहकारी” अशी त्यांची आठवण त्यांनी सांगितली. दादांचे महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या मनोगतात दादांनी ‘कामाचा माणूस’ ही ओळख निर्माण केल्याचे सांगितले. “शरीर जरी नष्ट झाले तरी कार्यातून आत्मा जिवंत राहतो,” असे त्यांनी नमूद केले.
या शोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, अभिनेते नाना पाटेकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, तसेच माजी सरन्यायाधीश भूषण गवई आदी मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शोकसभेत दादांच्या कार्याची आणि अंत्ययात्रेची चित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमाची सांगता प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी ‘पसायदान’ सादर करून केली.या वेळी पवार कुटुंबीय, विविध पक्षांचे नेते, मंत्री, खासदार, आमदार, उद्योगपती, प्रशासकीय अधिकारी, संपादक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…