शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात केवळ चोरीचा तपास न करता फिर्यादी आणि नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल बांडे यांनी केली आहे. यासंदर्भात शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, नगरपरिषद हद्दीतील मुख्य जलवाहिनी तसेच बंद करण्यात आलेल्या पाईपलाईनमधील जुने पाईप चोरीला गेल्याची तक्रार प्रशासनाने पोलिसांकडे दिली आहे. मात्र, हा प्रकार संशयास्पद असून नगरपरिषदेतील काही अधिकारी संगनमताने अनेक वर्षांपासून भंगार साहित्याची विक्री करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विक्री करून नंतर चोरी झाल्याचा बनाव रचून पोलीस व जनतेची दिशाभूल केली जात असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात २०२२ आणि २०२६ मधील दोन गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. २४ जून २०२२ रोजी सेंटर शाळेतील बंद खोलीतील भंगार चोरीप्रकरणी गुन्हा क्रमांक ४५९/२०२२ दाखल झाला होता. तसेच, सेंटर शाळेच्या मोकळ्या जागेतील सुमारे ४० लाख रुपयांच्या भंगार विक्रीप्रकरणी पाठपुराव्यानंतर १४ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ०३९/२०२६ दाखल झाल्याचे निवेदनात नमूद आहे.
या सर्व प्रकरणांमागे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करत, नव्याने दाखल झालेल्या पाईप चोरी प्रकरणासह यापूर्वीचे दोन्ही गुन्हे, संबंधित तक्रारी आणि भंगार व्यवहारांची एकत्रित चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाईप चोरी प्रकरणातील फिर्यादी आणि स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांची समोरासमोर चौकशी केल्यास सत्य समोर येईल, असा दावा तक्रारदारांनी केला असून चौकशीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारीही दर्शविली आहे.
यापूर्वी या प्रकरणासंदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक फुलारी यांनाही निवेदन देऊन संबंधित व्यक्तींची नावे व माहिती सादर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या आरोपांवर संबंधित अधिकारी किंवा नगरपरिषदेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि सर्वंकष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिरूर पोलिसांकडे करण्यात आली आहे.
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…