Shirur Police Station
शिरूर (तेजस फडके) : किराणा मालाच्या दुकानात सर्वसामान्यपणे धान्य, तेल, साखर, चहा, साबण आणि दैनंदिन वापराच्या वस्तू मिळतात. मात्र, शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही किराणा मालाच्या दुकानांमधून चक्क गावठी दारुची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून पुढे येत आहेत. त्यामुळे आता “दारू प्यायची आहे…? मग दारूच्या अड्ड्यावर कशाला जाता, थेट किराणा दुकानात चला!” अशी दबक्या आवाजात शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सध्या चर्चा सुरु झाली आहे.
शिरूर तालुक्यातील गावागावांत किराणा दुकानाच्या नावाखाली अवैध गावठी दारु विक्री सुरु असेल, तर स्थानिक पोलिसांचे गस्त पथक, बीट कर्मचारी आणि गोपनीय यंत्रणा नेमकी काय करत आहे…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवैध दारुविक्रीची माहिती सामान्य नागरिकांना मिळते; मग पोलिसांना ती का मिळत नाही…? माहिती मिळूनही कारवाई होत नाही का…? की किरकोळ स्वरुपाच्या कारवाया दाखवून मूळ विक्रीचे जाळे मात्र सुरुच ठेवले जात आहे, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे.
किराणा दुकान की अवैध दारूविक्री केंद्र…?
काही ठिकाणी दुकानाच्या दर्शनी भागात किराणा माल ठेवला जातो; मात्र दुकानाच्या मागील बाजूस, घरामध्ये, गोदामात किंवा आडोशाच्या ठिकाणी गावठी दारुचा साठा ठेवून विश्वासातील ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकदा विशिष्ट ग्राहक दुकानात गेल्यानंतर सांकेतिक शब्दांचा वापर करून दारु मागतात. त्यानंतर बाटली, पिशवी किंवा अन्य वस्तूंमध्ये लपवून दारु दिली जाते. विशेष म्हणजे हि विक्री दिवसाढवळ्या होत असेल, तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. गावातील नागरिक, महिला, तरुण आणि शाळकरी मुलांच्या नजरेसमोर असे प्रकार घडत असल्यास त्याचे सामाजिक परिणामही गंभीर होऊ शकतात.
महिलांना त्रास; कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती
गावठी दारु सहज उपलब्ध झाल्याने अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक आणि कौटुंबिक समस्या वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. मजुरी किंवा रोजंदारीतून मिळालेला पैसा घरखर्चासाठी वापरण्याऐवजी दारुत खर्च केला जातो. त्यातून घरगुती वाद, महिलांना शिवीगाळ, मारहाण, मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष आणि आर्थिक कर्जबाजारीपणा वाढण्याची शक्यता असते. किराणा माल घेण्यासाठी महिला आणि लहान मुले दुकानात येत असतात. त्याच ठिकाणी मद्यपींची वर्दळ आणि दारुविक्री सुरु असेल, तर महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. गावातील सार्वजनिक शांतता आणि सामाजिक वातावरण बिघडविणाऱ्या अशा प्रकारांकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
गावठी दारू कुठून येते…? पुरवठादार कोण…?
एखाद्या दुकानातून गावठी दारु विकली जात असेल, तर केवळ दुकानदारावर किरकोळ कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. ही दारु तयार कुठे होते…? दुकानांपर्यंत तिचा पुरवठा कोण करतो…? वाहतुकीसाठी कोणती वाहने वापरली जातात…? एका गावापुरता हा प्रकार आहे की त्यामागे मोठे जाळे कार्यरत आहे…? याचा मुळापर्यंत जाऊन तपास होणे आवश्यक आहे. पोलिसांनी किरकोळ विक्रेत्यांसह उत्पादक, वाहतूकदार, पुरवठादार आणि आर्थिक पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली, तरच अवैध व्यवसायाला आळा बसेल. अन्यथा एका ठिकाणी कारवाई झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी नव्या नावाने विक्री सुरु राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलिसांचे खबरी जाळे निष्क्रिय झाले का…?
पुर्वी गावागावांतील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांच्या बीट कर्मचाऱ्यांना आणि गोपनीय यंत्रणेला तत्काळ मिळत असे. मात्र, आता अवैध व्यवसाय खुलेआम सुरु असल्याच्या तक्रारी असूनही ठोस कारवाई दिसत नसेल, तर पोलिसांचे खबरी जाळे निष्क्रिय झाले आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. गावातील एखादा सामान्य माणूस दारु विक्रीची माहिती पोलिसांना देण्यास घाबरतो. कारण तक्रारदाराचे नाव अवैध व्यावसायिकापर्यंत पोहोचण्याची भीती असते. त्यामुळे पोलिसांनी तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवून विशेष हेल्पलाइन किंवा स्वतंत्र पथकाद्वारे माहिती स्वीकारणे गरजेचे आहे.
कारवाई फक्त कागदावर नको…
अवैध दारुविक्री विरोधातील कारवाई केवळ एखादी बाटली, काही लिटर दारू आणि किरकोळ रक्कम जप्त करण्यापुरती मर्यादित राहू नये. वारंवार दारूविक्री करणाऱ्या दुकानांचा परवाना, मालमत्तेचा वापर, पुरवठ्याचे स्रोत आणि संबंधित व्यक्तींची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. ज्या किराणा दुकानातून अवैध दारु विक्री होत असल्याचे निष्पन्न होईल, त्या दुकानाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याबरोबरच संबंधित परवाने रद्द करण्यासाठी महसूल, ग्रामपंचायत, अन्न व औषध प्रशासन आणि अन्य विभागांनी समन्वयाने पावले उचलणे आवश्यक आहे.
दारुविक्री करणाऱ्यांना राजकीय वरदहस्त…?
काही अवैध व्यावसायिकांना स्थानिक राजकीय पदाधिकारी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधिंचा वरदहस्त असल्याची चर्चा अनेकदा गावपातळीवर होत असते. त्यामुळे कारवाई करण्यासाठी गेलेल्या यंत्रणांवर दबाव आणला जातो का…? पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप होतो का…? याचाही वरिष्ठांनी आढावा घेण्याची गरज आहे. राजकीय ओळख किंवा दबावाच्या जोरावर अवैध व्यवसाय चालत असेल, तर कायदा सर्वांसाठी समान आहे हा विश्वासच ढासळतो. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष कारवाई करणे अपेक्षित आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवावी…
पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष तपासणी मोहीम राबवावी. संशयित किराणा दुकाने, बंद गाळे, गोदामे, हॉटेलच्या मागील बाजू आणि गावठी दारु विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणांवर अचानक छापे टाकावेत. तसेच प्रत्येक बीट कर्मचाऱ्याकडून त्यांच्या हद्दीतील अवैध व्यवसायाबाबत लेखी माहिती मागवावी. कारवाईत हलगर्जीपणा किंवा संगनमत आढळल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवरही विभागीय कारवाई झाली पाहिजे.
सर्वसामान्य नागरिकांना पडलेले काही प्रश्न
1) किराणा दुकानातुन गावठी दारु विकली जात असल्याची माहिती पोलिसांना नाही का…?
2) गावातील अवैध धंद्यांवर लक्ष ठेवणारे बीट कर्मचारी काय करत आहेत…?
3) विक्रेत्यांवर वारंवार कारवाई होऊनही विक्री बंद का होत नाही…?
4) गावठी दारुचा मुख्य उत्पादक आणि पुरवठादार कोण आहे..?
5) अवैध व्यवसायाला राजकीय संरक्षण किंवा पोलिसांतील कोणाचे पाठबळ आहे का…?
6) महिला आणि नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल कधी घेतली जाणार…?
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ केवळ ब्रीदवाक्य राहणार का…?
पोलिसांचे ब्रीदवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट. मात्र, किराणा दुकानाच्या आडून गावठी दारूची विक्री सुरू असल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असेल, तर हे ब्रीदवाक्य केवळ पोलिस वाहनावर आणि कार्यालयाच्या भिंतीवरच उरणार का, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, शिरूर पोलिसांनी दिखाऊ कारवायांऐवजी गावठी दारु च्या संपूर्ण साखळीवर घाव घालण्याची वेळ आली आहे. अन्यथा “किराणा दुकानात धान्य कमी आणि दारू जास्त” अशी शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीची बदनामी होण्यास वेळ लागणार नाही.
शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…
दारू पाजण्याच्या वादातून वडगाव रासाईत मित्राचा खून
शिरूर तालुक्यात चहाच्या दुकानात मिळत होती चक्क दारू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…
वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…
मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…
राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…
मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…