शिरूर (अरुणकुमार मोटे): वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे दि.१६ रोजी रात्री उशिरा दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी वंदना अविनाश उर्फ विशाल जावीर (वय ३५), व्यवसाय – शेतमजुरी, रा. मराठी शाळेच्या पाठीमागे, वडगावरासाई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती अविनाश उर्फ विशाल जयवंत जावीर (वय ३०) हे वेल्डिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. (दि. १६) ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता त्यांचा मित्र विशाल कारभारी उदमले याने त्यांना घराबाहेर बोलावले.
यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास विशाल उदमले, अविनाश जावीर व राहुल दत्ता गंवाडे (रा. वडगावरासाई) हे तिघेही वडगावरासाई येथील सृष्टी हॉटेल बिअरबार समोर, अंबिका पानटपरी जवळ दारू पित बसले होते. यावेळी दारू पाजण्याच्या कारणावरून अविनाश व राहुल गंवाडे यांच्यात वाद झाला.
वाद तीव्र होताच राहुल गंवाडे याने अविनाशला हाताने मारहाण केली. एवढ्यावरच तो न थांबता त्याने अविनाश यांचे डोके दगडावर आपटले. या मारहाणीमुळे अविनाश यांचा नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला व ते निपचित पडले. मदतीसाठी उपस्थित असलेल्या लोकांनी जावीर यांना तातडीने परभाणे हॉस्पिटल येथे नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर आरोपी राहुल गंवाडे घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सृष्टी हॉटेलचे मालक दिगंबर ढवळे, अंबिका पानटपरीचे मालक मनोज शेलार यांच्यासह स्थानिक कामगारांनी आरोपीचा शोध घेतला, मात्र तो फरार झाला.या प्रकरणी मांडवगणफराटा पोलीस दुरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू पाजण्याच्या किरकोळ कारणावरून मित्राचा जीव घेण्याच्या या घटनेने वडगावरासाई गावात शोककळा पसरली आहे. पोलीसांनी आरोपीचा शोध वेगाने सुरू केला असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.