शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर प्रशासकीय इमारतीच्या वाहनतळावर एका खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव आढळल्याने वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी या गैरप्रकाराची तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुर्वीही वाळुंज यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील एका मंडलाधिकार्यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.
शिरूर प्रशासकीय इमारतीतील वाहनतळावर (दि. २६) मार्च रोजी एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार आढळली, ज्याच्या बोनेट आणि मागील बाजूस ‘महाराष्ट्र शासन’ असे रेडियमने लिहिले होते. तसेच, वाहन चालकाने कोल्हापूरच्या एका क्लास वन अधिकाऱ्याचे नाव सांगून रुबाब दाखवत असल्याचेही निदर्शनास आले.
सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी हा प्रकार लक्षात घेताच शिरूर वाहतूक पोलीस विभागातील राजेंद्र वाघमोडे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वाहतूक पोलीस ज्ञानदेव गोरे आणि झाडबुके यांनी तातडीने घटनास्थळी येऊन वाहन क्रमांक तपासला. वाहन खासगी असल्याचे स्पष्ट झाल्यावर संबंधित वाहन चालक विनायक खेडकर याला बोलावून घेतले.
वाहनावर शासन नाव लिहिणे मोटार वाहन कायद्याच्या उल्लंघनात येत असल्याने पोलिसांनी ₹५००/- रुपयांचे ऑनलाईन चलन काढले. त्याचबरोबर, लिहिलेले नाव त्वरित हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, क्लास वन अधिकारी किरण पाटील यांचे नाव सांगत रुबाब दाखवणाऱ्या या कर्मचाऱ्याविरोधात पुढील चौकशी होणार असल्याचे वाळुंज यांनी सांगितले.
या संदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज म्हणाले की,”अनेक सरकारी कर्मचारी आणि अधिकारी लोकसेवक असूनही स्वतःला व्हीआयपी समजतात. खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’, ‘पोलिस’, ‘न्यायाधीश’ अशा पाट्या लावून ते जनतेमध्ये चुकीचा संदेश देतात. तसेच, टोलपासून सूट मिळवण्यासाठी आणि पोलिस कारवायांपासून वाचण्यासाठी असे प्रकार केले जातात.”
ते पुढे म्हणाले, “शासनाच्या स्वमालकीच्या वाहनांशिवाय कोणत्याही खासगी वाहनावर अशा प्रकारच्या पाट्या लावण्यास सक्त मनाई आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने २०२४ मध्येच अशा गैरप्रकारांविरोधात कडक आदेश दिले होते. मात्र, यावर अद्याप ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाने संयुक्त मोहीम राबवून अशा प्रकारच्या सर्व वाहनांवर तातडीने कारवाई करावी.” शिरूर वाहतूक पोलीस विभागातील राजेंद्र वाघमोडे यांनी सांगितले की,
“अशा प्रकारे सरकारी नावाचा गैरवापर करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आहेत. पुढील तपासासाठी हे प्रकरण परिवहन विभागाकडे सुपूर्त करण्यात येईल.”
मोटार वाहन कायद्यांनुसार, खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’, ‘पोलिस’, ‘केंद्र शासन’ यांसारखी नावे लिहिण्यास सक्त मनाई आहे. गृह विभागानेही पोलिसांना यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यापुढे असे वाहन आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर वाहतूक पोलिस व परिवहन विभाग कारवाई करून वरिष्ठांकडे अहवाल पाठवणार आहेत.
जनतेतून समाधान व्यक्त..
शिरूरमध्ये अशा प्रकारच्या खासगी वाहनांवर कारवाई होण्याची ही दुसरी वेळ आहे. सरकारी गाडीचा रुबाब दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा अशा गैरप्रकारावर आळा बसला आहे.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…