मुख्य बातम्या

सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नका; सतर्कताच आर्थिक फसवणुकीचा प्रभावी उपाय; कुमार कदम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असतानाच सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट कर्ज योजना, डिजिटल अरेस्ट आणि खोट्या गुंतवणूक योजनांचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी न पडता नागरिकांनी प्रत्येक आर्थिक व्यवहार थांबून, विचार करुन आणि खात्री करुनच करावा. सतर्कता आणि वेळेत तक्रार करणे हाच सायबर फसवणूक रोखण्याचा प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC Police station) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी केले.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने ‘सायबर सुरक्षा व आर्थिक गुन्हे जनजागृती कार्यक्रम २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस उपनिरीक्षक सविता काळे यांनी केली. सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार झपाट्याने वाढत असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी मोबाईलचा जबाबदारीने वापर करण्याची गरज व्यक्त केली.

लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये मोबाईलचा अतिवापर चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन गेम, अश्लील व्हिडिओ आणि अनोळखी व्यक्तींशी होणारा संपर्क यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यासह त्यांच्या सुरक्षिततेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईल देऊन मोकळे न होता त्यांच्या मोबाईल वापरावर नियमित लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे यांनी केले.

पोलीस निरीक्षक कुमार कदम म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला कधी ना कधी सायबर फ्रॉड किंवा सायबर क्राईमचा अनुभव येण्याची शक्यता आहे. आज जवळपास प्रत्येक नागरिक मोबाईलवर विविध ॲपचा वापर करतो. मात्र, एखादे ॲप डाउनलोड करताना दिलेल्या परवानग्या, आलेल्या अनोळखी लिंक, बनावट संदेश आणि फोन कॉल याकडे दुर्लक्ष केल्यास वैयक्तिक तसेच बँक खात्याची गोपनीय माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती जाऊ शकते.

घरबसल्या मोठी कमाई, कमी व्याजदरात तातडीचे कर्ज, शासकीय योजनेचा लाभ, बक्षीस, लॉटरी किंवा गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. “घरबसल्या कोणतीही अनोळखी व्यक्ती विनाकारण पैसे देत नाही, त्यांचा काहीतरी फायदा किंवा फसवणूक करण्याच्या उद्देशानेचे ते आपल्याला आर्थिक मोहात पाडतात ” हे नागरिकांनी लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पोलीस, सीबीआय, ईडी, आयकर किंवा अन्य सरकारी यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना व्हिडिओ कॉलद्वारे धमकावले जाते. त्यांच्या आधार कार्ड, बँक खाते किंवा मोबाईल क्रमांकाचा गुन्ह्यात वापर झाल्याचे सांगून पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडले जाते. भारतात फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे कोणालाही डिजिटल अटक केली जात नाही. अशा प्रकारचा कॉल आल्यास घाबरुन पैसे न पाठवता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असेही कदम यांनी यावेळी सांगितले.

‘ज्यूस जॅकिंग’ या नव्या प्रकाराबाबतही नागरिकांना सावध करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणचे अनोळखी यूएसबी चार्जिंग पॉइंट, दुसऱ्या व्यक्तीचा चार्जर, केबल किंवा पॉवरबँक वापरल्यास मोबाईलमधील माहिती चोरीला जाण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अनोळखी ठिकाणी शक्यतो स्वतःचा चार्जर आणि पॉवरबँक वापरावी. इतर कोणाचाही चार्जर, यूएसबी चार्जिंग पॉइंट किंवा केबल वापरु नये.

तसेच कोणतीही ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास वेळ न घालवता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच महिला आणि मुलींवर कोणतेही संकट आल्यास डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकाची मदत घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक कदम यांनी केले. या कार्यक्रमाला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिक्षक, महिला समिती सदस्य, सराफ व्यावसायिक, पत्रकार, पोलीस पाटील आणि नागरिक मिळून सुमारे ५० ते ६० जण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि समाजाचे संरक्षण करण्याची ‘सायबर शपथ’ देण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

11 मिनिटे ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

16 मिनिटे ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

21 मिनिटे ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

36 मिनिटे ago

महाराष्ट्रात डिजिटल प्रॉपर्टी कार्डची तयारी; मालमत्ता व्यवहार होणार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक.

मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…

42 मिनिटे ago

अनेक आजारांवर एरंडेल तेल गुणकारी

रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…

53 मिनिटे ago