Video; रांजणगावच्या महागणपती मंदिरात पाच दिवसांत ४.५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त श्री क्षेत्र अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर फुलांच्या बहरात नटले आहे. तब्बल पाच टन झेंडू, गुलाब, शेवंती व विविध रंगीबेरंगी फुलांनी मंदिर, महाद्वार व परिसराची सजावट करण्यात आली असून दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे डोळे दिपून जात आहेत.

रविवार दि २४ ऑगस्ट पासुन सुरु असलेली द्वारयात्रा गुरवार दि २८ ऑगस्ट सकाळी १० वाजेपर्यंत मुक्तद्वार दर्शन सुरु ठेवण्यात आले होते. केवळ पाच दिवसांत साडेचार लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर मुक्तद्वार दर्शन बंद करण्यात आले,” अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी दिली.

 

भक्तिमय वातावरणात उत्सवाची सुरुवात…

भक्ती, श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम रांजणगावमध्ये पाहायला मिळाला. श्रावणातील हलक्या सरींनी उत्सवाला अधिक मंगलमय वातावरण लाभले. “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने संपुर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. दररोज मंदिरात नवनवीन फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई केली जात असल्याने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत.

 

देवस्थान ट्रस्टकडून भाविकांसाठी चोख सुविधा…

रांजणगावला महागणपतीच्या मुक्तद्वार दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने ट्रस्टच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय वाहनतळावर भाविकांसाठी खास सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटची थीम दररोज बदलल्याने भाविकांमध्ये विशेष आकर्षण ठरले.

 

रांजणगाव पोलीसांचा चोख बंदोबस्त…

भाविकांची गर्दी सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांकडून भक्कम व्यवस्था करण्यात आली. शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ अधिकारी व १२५ पोलिस कर्मचारी तैनात होते. संपुर्ण यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे देखरेख करण्यात आली.

 

रांजणगावला भाविकांची गर्दी उसळली…

रांजणगावकडे येणारे प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले. दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, भजनी मंडळे, कीर्तन-प्रवचनांनी यात्रेची शोभा वाढवली. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या लक्षणीय वाढली असल्याचे ट्रस्टने सांगितले. गणेशोत्सवाच्या पुढील दिवसांतही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रांजणगावला भाद्रपद गणेशोत्सवाची जय्यत तयारी; महागणपतीचे मुक्तद्वार दर्शन

रांजणगावच्या ४० वर्षीय तरुणाने तब्बल ६१ किमी अंतर कापत एकाच दिवसात केल्या चार द्वारयात्रा