Mahaganpati

महागणपती मुक्तद्वार दर्शनाचा भाविकांनी लाभ घ्यावा: स्वाती पाचुंदकर

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव गणपती येथील भाद्र्पद गणेशउत्सवा निमित्त रांजणगाव देवस्थान ट्रस्ट तर्फे १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर पर्यंत महा गणपतीस मुक्तद्वार दर्शन सुरु राहणार आहे. या काळात श्रींच्या मुर्तीस हात लावून दर्शन घेता येणार असून, मुर्तीस जलाभिषेक करता येणार आहे, याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

भाद्रपद गणेशोत्सव निमित्ताने देवस्थानने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी देवस्थानची एक बैठक आयोजीत केली होती. त्यावेळी मुख्य विश्वस्त ओमकार देव, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव उपस्थित होते. या वेळी अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी सांगितले की, भाद्रपद ‘गणेशोत्सव निमित्त १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अष्टविनायक पैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या रांजणगाव गणपती येथे भाद्रपद गणेशोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. दुरुस्तीची कामे पूर्णत्वास आली आहेत. मंदिर परिसरात सर्वत्र रोषणाईसह फुलांची सजावट केली आहे. मुख्य मंदिरासमोरील लाकडी सभामंडपाची दुरुस्ती सुरू असून, नूतनीकरण व पॉलिशमुळे हा सभामंडप आकर्षक दिसत आहे.’

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टने भरगच्च धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंदिरा समोरील प्रसिद्ध लाकडी सभामंडपाचे नूतनीकरण केले असून, सभामंडपाच्या बाहेरील बाजूस असलेले स्टीलचे ग्रील काढून तेथे लाकडी ग्रील बसविले आहे. त्यामुळे या सभामंडपाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. मंदिरावर परिसरात रोषणाईबरोबरच रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट केली आहे. मुख्य नगारखाना इमारत व त्यापुढील गजराजाच्या पुतळ्यांना मनमोहक रंगरंगोटी केली आहे.

मंदिराच्या तीन बाजूंना वाहनतळांची व्यवस्था केली असून, मंदिरालगतच्या वाहनतळाचे सिमेंट कॉंक्रिटने अस्तरीकरण केले आहे. तीनही वाहनतळांजवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. यात्रा काळात १५० पोलिसांसह चोख बंदोबस्त लावला आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस, होमगार्ड तर अनुचित प्रकार व दुर्घटना टाळण्यासाठी रेस्क्यू पथकही तैनात केला आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर परिसर, बाहेरील बाजू व मुख्य रस्त्यांपर्यंतच्या मार्गावर १२० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, असेही स्वाती पाचुंदकर यांनी सांगितले.

पालखी…
गणेशोत्सवांतर्गत गणेशोत्सवासाठी, आपल्या बहिणींना रांजणगावला आणण्यासाठी महागणपती पालखी घेऊन जातात, अशी परंपरा असल्याने शनिवारी करडे येथील दोंदलाई, रविवारी निमगाव म्हाळुंगी येथील शिरसाई, सोमवारी गणेगाव येथील ओझराई आणि मंगळवारी ढोकसांगवी येथील मुक्ताई मंदिरापर्यंत पालखीची मिरवणूक काढली जाणार आहे. या काळात पहाटे पाच ते सायंकाळी पाच या वेळेत मुक्तद्वार दर्शनाची पर्वणी भाविकांना मिळणार आहे. गणेश चतुर्थीला चक्रांकित महाराज आळंदीकर यांचे गणेश जन्म व गणेश माहात्म्यावर आधारित कीर्तन होणार आहे. बुधवारी महागणपतीच्या पालखीची देऊळवाड्यातील प्रदक्षिणाने सांगता होणार आहे. २१ सप्टेंबर रोजी भाविकांची दंडवते व त्यानंतर मोरेश्वर बुवा जोशी यांचे काल्याचे आणि सायंकाळी त्यांच्याच पाऊल घडीच्या कीर्तनाने या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे.

सात दिवस चालणाऱ्या या भाद्र्पद गणेशोत्सवा निमित्त राज्यातुन लाखो भाविक दर्शन घेत असताना लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी जलद रांग दर्शनासाठी देवस्थान प्रयत्न करणार आहे. देवस्थान ट्रस्ट्च्या ९६ एकर जागेत एक नविन विहीर तसेच जुन्या विहीरीचे संवर्धन करण्यात आले असून, गो शाळा बांधण्यात आली आहे. बागेचे शुशोभीकरण व अनेक विकास कामे करण्यात आली असून, आगामी काळात श्री महागणपती साठी सोन्याचे पितांबर सोहळे व चांदीचा मुलामा असलेला दर्शन गाभारा करण्याचा मानस आहे, असे स्वाती पाचुंदकर, ओमकार देव व तुषार पाचुंदकर यांनी सांगितले. यात्रेच्या तयारीच्या निमित्ताने तहसिलदार बाळासाहेब म्हस्के व रांजणगावचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी तयारीचा आढावा घेतला.

Video : वडे तळताना ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ सुचलं गाणं अन्…

रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण

रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी स्वाती पाचुंदकर यांची बिनविरोध निवड

श्री महागणपती: रांजणगाव गणपती