महाराष्ट्र

हे सरकार शेतकर्‍यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगाराचे नाहीय हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे आहे…

मुंबई: हे सरकार शेतकर्‍यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगाराचं नाहीय हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज अर्थसंकल्पावर बोलताना केली. या सरकारची जाहिरातच अशी आहे ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान’ परंतु गतिमान होण्याऐवजी महाराष्ट्र मागे रहायला लागला आहे. महाराष्ट्राची गती कमी व्हायला लागली आहे. आणि महाराष्ट्राची प्रगती खुंटू लागली आहे हे चित्र ८-९ महिन्यातील आहे.

विकास वाढीचा दर बघितला ग्रोथ रेट आमचं सरकार असताना ९.१ टक्के होता तो यांचे सरकार आल्यावर ६.८ टक्के झाला आहे. मुख्यमंत्री नेहमी बोलतात तुम्ही काहीच केले नाही बोलतात अडीच वर्षे तर ते आमच्या सरकारमध्ये होते. सरकारमध्ये आमच्या शेजारी बसायचे आणि तेच बोलत आहेत आम्ही काही केले नाही. याचंही भान त्यांना राहिले नाही की त्या सरकारमध्ये होतो त्या सरकारने काहीच काम केले नाही. हे म्हणणे योग्य नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

आर्थिक पाहणीमध्ये ‘निर्णय वेगवान सरकार गतीमान’ मागील वर्षात ४० टक्के डीपीडीचा खर्चच केला नाही. महाराष्ट्रात गुंतवणूक किती झाली २०२० मध्ये ४४ हजार २८८ कोटी २०२१ मध्ये २ लाख ७७ हजार कोटी रुपये झाली. २०२२ मध्ये ३५ हजार कोटी पर्यंत पोचलो गुंतवणूकीमध्ये गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर गेले. कर्नाटक दुसर्‍या क्रमांकावर आणि महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे. तुम्ही सुरतेला गेला नसता तर गुजरात आणि कर्नाटकच्या पण पुढे राहिलो असतो. २१-२२ मध्ये आपण देशात अव्वल दर्जाचे होतो. मुंबईमध्ये नवीन सरकार आल्यावर मोठमोठे बॅनर सरकारने लावलेले आमचं सरकार आल्यावर विघ्न टळलं परंतु आकडे वेगळे सांगायला लागले आहे.

तुमचं सरकार आले आणि महाराष्ट्रावर विघ्न आले अशी आकडेवारी दिसायला लागली आहे. उद्योग राज्यातून गेले हे जगजाहीर आहे. परंतु उद्योगमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर केले होते पहिल्यांदा पंधरा दिवसात नंतर बोलले ४० दिवसात आणतो आताच्या अधिवेशनात आणतो परंतु सहा महिन्यात यांना श्वेतपत्रिका काढता आली नाही कारण या श्वेतपत्रिकेमधून सर्वच पुढे येणार आहे म्हणून श्वेतपत्रिका काढायला हे सरकार टाळाटाळ करत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

कोणत्या क्षेत्रासाठी या सरकारची चांगली कामगिरी आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबत अमुकतमुक केले सांगत आहेत मात्र या आठ ते नऊ महिन्यात महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी सरासरीने आत्महत्या करत आहेत मागच्या तिन्ही सरकारमधील शेतकरी आत्महत्यांची संख्या सरासरी पाहिली तर २०१४ – १९ या पाच वर्षांत पाच हजार ६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१९ – २१ या अडीच वर्षात १६६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मागच्या नऊ महिन्यात एक हजार २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे चित्र पाहिले तर आत्महत्येचे प्रमाण महाराष्ट्रात वाढले आहे. शेतकर्‍यांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे. महिलांच्या बाबतीतदेखील महिला लाभार्थ्यांच्या योजनेत ६५ टक्के घट झाली आहे.

इंटिग्रेटेड ४० प्रोटेक्शन स्कीमच्या लाभार्थ्यांमध्ये ७० टक्के घट झाली आहे. एसी एसटी दिलेला निधी या सरकारला खर्च करता आलेला नाही. आणि म्हणून या सरकारचे अपयश हे आकडेवारीत दिसायला लागले आहे. म्हणून म्हटले सत्तेत आल्याआल्या बॅनर लावले आमचे सरकार आले विघ्न टळले आता बॅनर लावायची पाळी आली आहे तुमचे सरकार आले आणि महाराष्ट्रावर विघ्न आले अशी घणाघाती टीकाही जयंत पाटील यांनी केली.

उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्या सतत कानाला जाऊन लागणार्‍यांनी आठवण करून दिली तर बरं होईल. म्हणजे कानाला लागणार्‍यांचे कधी भले होत नाही असा टोला लगावतानाच सुधाकरराव नाईक यांचे सरकार असताना त्यांच्या सोबत दोघेजण सतत असायचे याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात पंचामृत पध्दत मांडली. पंचामृत म्हणजे दही, दूध, तूप, मध, साखर या पाच गोष्टी आम्हाला माहीत आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी जे पंचामृत काढले ते जरा वेगळे आहे. अर्थसंकल्पात अमृत काळातील अर्थसंकल्प असे म्हटले आहे. अमृतकाळ म्हणजे नक्की कोणता. अमृतकाळ म्हणजे नक्की काय… तो कधी येणार आहे… तो आलाय का? त्या अमृतकाळमध्ये नक्की कोणत्या गोष्टी होतील याचे जनतेत औत्सुक्य आहे. आम्हाला अमृतकाळ माहित नाही. आम्हाला शिवकाळ माहीत आहे.आमचा इंटरेस्ट शिवकाळात जास्त आहे. शिवस्वराज्यात जास्त आहे. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा असणार्‍या जनतेच्या मनात हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालावे या भूमिकेतून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहेत. अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सुराज्याची निर्मिती करण्यासाठी शासन पुढची वाटचाल करेल. परंतु मधल्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात अपमान झाला.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अपमान झाला. हा अवमान सुरू होता त्यावेळी तुमचं सरकार काय करत होते. आणि जे महाराष्ट्र सोडून गेले त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंत्रीमंडळाने केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत असे शब्द काढणे व महापुरुषांचा अपमान करणे हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही. त्यावेळी तुमचं सरकार काय करत होतं असा खडा सवालही जयंत पाटील यांनी केला. महसूल तुटीचा १६ हजार १२२ कोटीचा आहे. या अर्थसंकल्पात एवढे स्वप्नरंजन झाले आहे.या सगळ्या स्वप्नांसाठी निधी द्यायचा झाला तर १६ हजार कोटींचा महसूली तुट होणार नाही तर एक लाख कोटीवर जाऊ शकतो.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करायची आहे हे फार उत्साहाने सांगितले होते. तर महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलर २०२८ पर्यंत करायची आहे.असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. आपण कोणत्या परिस्थितीत आहे याची माहिती सरकारला देण्याची गरज आहे. अर्थसंकल्पात राज्य आर्थिक सल्लागार समितीचे आणि मित्र या संस्थेचा उल्लेख केला. निती आयोग प्रमाणे महाराष्ट्रात मित्र आयोग निर्माण करण्यात आला आहे. पूर्वी नियोजन आयोग होता तसा मित्र आयोग निर्माण करण्यात आला आहे. हे ठीक आहे. या आर्थिक सल्लागार समितीवर कोण आहे. याचा पाढाच जयंत पाटील यांनी मांडला आणि नेमके कोण असावेत आणि इतर राज्यात आर्थिक सल्लागार समितीवर कोण आहेत याची माहितीही जयंत पाटील यांनी सभागृहात दिली.

तामिळनाडू सारख्या राज्यात जागतिक पातळीवरील लोक आर्थिक सल्लागार समितीवर आहेत परंतु महाराष्ट्रातील ज्या कंपन्या गुंतवणूक केली आहे त्यांचे एमडी, ना घेतले आहे. गुणात्मक फरक बघितला तर हे स्पष्ट होते असेही जयंत पाटील म्हणाले.

मित्र ही संस्था महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे की, आपल्या मित्रांना मानाची पदे देण्यासाठी आहे. हा एक विचार करणे आवश्यक आहे. निती आयोग केला त्याचे अध्यक्ष पंतप्रधान आहेत तसे महाराष्ट्रात मित्र आयोगावर मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत. निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोण आहे तर सुमन बेरी हे आहेत. तर मित्राचे उपाध्यक्ष कोण आहेत तर अजय आशर हे ठाण्यातील सुप्रसिद्ध आशर ग्रुपचे अध्यक्ष आहेत. चेअरमन आणि एमडी दोन्ही एकच आहेत. काहीकाळ वकीली केली आहे. त्यापलीकडे काही दिसत नाही. ३ मार्च २०२१ ला या सभागृहाचे सदस्य अतिशय हुशार बुध्दीमान ज्याचा वापर भाजप करून घेत नाही असे आशिष शेलार यांनी याच सभागृहात मिहिर कोटेजा यांचा उल्लेख करून सांगितले की, अजय आशर नावाचे गृहस्थ हे मंत्रालयात बसून नगरविकास खात्याचे निर्णय घेतात नियतीचा खेळ विचित्र असतो ते कपाळावर असावे लागते. अजय आशर यांना मंत्री पदाचा दर्जा मिळाला मात्र आशिष शेलार हे मंत्री पदाच्या प्रतिक्षेत आहेत अशी मिश्किल टिप्पणीही जयंत पाटील यांनी केली.

परवा ठाण्यात गेलो होतो त्यावेळी एक आशर ग्रुपचे बॅनर बघितले आशर मेळा होता त्या बॅनरवर ‘आता एक रकमी भरा, पुढची अडीच काही नाही… हे मोठे बॅनर आहे. एवढं मोठं आहे की, ती स्कीम आहे असे समजले.आता आशरांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षे काही नाही. २२ डिसेंबर २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी सांगितले महासत्तांतर झाले त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि त्यांनी बिल क्लिंटनने त्यांच्या विषयी चांगले उद्गार काढले. एकनाथ शिंदे कष्ट करतात त्याबद्दल शंका नाही. ते कधी जेवतात कधी झोपतात त्याचे बिल क्लिंटन यांना आश्चर्य वाटले. आता अजय आशर अमेरिकेत गेले आहे. अमेरीकेचा विकास दर दोन टक्के आहे. त्यामुळे अजय आशर त्यांना सल्ला द्यायला गेले आहेत.

महाराष्ट्राचा जसा ६.८ टक्के दर आहे तसा दर व विकास वाढीचा वेग वाढवण्यासाठी जो बायडेनला व बिल क्लिंटनला भेटायला गेले आहेत दुसरे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र काढून बघितले तर लक्षात येईल. एकजण बिल्डर आहे तर एकजण माजी आमदार आहेत. मित्रा सारखी संस्था जबाबदारीची ज्यांच्याकडून महाराष्ट्राच्या विकास वाढीचा वेग नियोजनाची पध्दत चांगली झाली यासाठी मार्गदर्शन घ्यायचे ते आता अजय आशर यांच्याकडून घ्यायचे आहे मुख्यमंत्री घेतील. ग्रोथ रेट आपल्याला महाराष्ट्राचा वाढवायचा आहे अजय आशरचा ग्रोथ रेट वाढवायचा नाहीय.हे त्या संस्थेने लक्षात घ्यायला हवे असा जोरदार टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

नमो शेतकरी सन्मान निधी जाहीर झाला सहा हजार रुपये दरवर्षी मिळणार आहे असे दिसते. म्हणजे दिवसाला कष्ट करणार्‍या शेतकऱ्यांची सोळा रुपये किंमत केली असे दिसते. वडापाव देखील सोळा रुपयात मिळत नाही. पाव लिटर दूध मिळणे बंद झाले. त्याऐवजी वीज बिलाची माफी झाली असती तर लोकांनी तुमचे कौतुक केले असते. डिझेल चा दर इतका वाढला आहे. डिझेल वापरणाऱ्यां शेतकऱ्यांना सवलत दिली असती तर ती कायम स्वरुपाची सवलत झाली असती. शेतमाल पोचवायला ३० टक्के खर्च होतो. त्यावर गुंतवणूक महाराष्ट्रात केली आणि माल बाजारात नेला तर स्टोरेजची व्यवस्था अधिक चांगली केली असती तर कौतुक केले असते. एक रुपयात इन्शुरन्स काढायची व्यवस्था केली आहे. शेतकरी प्रिमियम भरायला नाही म्हणत नाही शेतकऱ्यांची अडचण ही आहे की प्रिमियम सगळे भरतात त्यानंतर जे निकष लावले जातात आणि क्लेम सेटल करायला जे हेलपाटे घालावे लागतात ती शेतकऱ्यांची खरी अडचण आहे.

प्रिमियम शेतकरी देत होता त्यावेळी इन्शुरन्स जरातरी मिळत होता. आता एक रुपया शेतकऱ्यांकडून घेतला म्हटल्यावर इन्शुरन्स कंपन्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दाद द्यायला बंद होतील. त्याचा अर्थ असा होईल तुम्ही क्लेम सेटल करायला जाल त्यावेळी तो मिळायला हवा. इन्शुरन्स कंपनी ज्या अटी लागू होणार नाही त्या अटी घालतात. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपन्याबद्दल तक्रार आहे.प्रिमियम बद्दल नाही. नुकसान भरपाई देताना इन्शुरन्स कंपनी जो त्रास शेतकऱ्यांना देतात तो आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

तुम्ही मोदी साहेबांच्या नावाने एक योजना जाहीर केली आहे त्या योजनेला नरेंद्र मोदी आवास योजना असे पूर्ण नाव द्या ना. नाहीतर नुसते नाव घेणारे बरेच लोकं आहेत. नीरव मोदी, ललित मोदी यांचीही नावे घेतात.आपल्याला आपल्या पंतप्रधानाचा अभिमान प्रत्येकाला आहे त्यांचे पूर्ण नाव द्या मोदी योजना असे नाव देऊ नका… ही पहिलीच घटना आहे. नाव देताय तर त्या योजनेचे गांभीर्य लक्षात घ्या असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला.

अन्न धान्याचा पुरवठा १४ जिल्हयात करण्याऐवजी पैसे देण्याचे ठरवले आहे. सबसिडी थेट बँक खात्यात दिली म्हणजे गॅस सबसिडी बँकेत कमी केली मग हळूहळू ती बंद केली तसा हा एक मार्ग असावा. १४ विपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अन्न धान्याऐवजी बँक खात्यात पैसे पाठवायला लागलो तर कदाचित पुढच्या काळात ही योजना बंद करण्याची मानसिकता तयार होईल. आपण मोदी आवास योजना नाव दिले आहे. २०१५ साली सरकारने घोषणा केलेली १९ लाख घरे २०२२ पर्यंत बांधू पण ही घरे कुठे गेली. पंचामृतातून दहा लाख घरे ओबीसीसाठी देणार हा चांगला उपक्रम आहे परंतु मागच्या १९ लाख घरांचा हिशोब द्या ना. किती बांधली… मागचं काढायचं नाही परंतु तुम्ही ती सवय लावली आहे. २०१५ – १६ घोषणा केली त्या १९ लाखांच्या घरांचे काय झाले. डबल इंजिन सरकार बोलता तसे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना भाषणात २०१९ ला ट्रान्सहार्बर लिंक पूर्ण होईल.

विमानतळ, कोस्टल रोड पूर्ण होईल. मोदींनी तर २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. हे झालं का? काहीच झाले नाही. दहा लाखापैकी तीन लाख घरे ३१ मार्च २०२४ ला पूर्ण होणार अशी घोषणा केली आहे. आकडेवारी काय सांगते, महाराष्ट्रात अर्बन एरियात १६ लाख ३४ हजार घरे, त्यातील ९ लाख १२ हजार घरे पूर्ण झाली. त्यातील ६ लाख ६८ हजार घरेच आक्यपाईड आहेत. ६ लाख २५ हजार घरांचे कामच झाले नाही. दरवर्षी दीड ते पावणे दोन लाख घरे आपण बांधून शकतो हा आपला रेट आहे. जी तीन लाख घरांची आश्वासने दहा लाख घरांपैकी देताय हे चुकीचे आहे.

धनगर समाजाला शेळीमेंढी पालनासाठी दहा हजार कोटी रुपये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. धनगर समाजातील मेंढपालासाठी ही मदत फार महत्वाची आहे. दहा हजार कोटी रुपये एका वर्षात देणे शक्य नाही. एक हजार दोन हजार कोटी मेंढपालासाठी द्या. आणि उरलेले सात आठ हजार कोटी रुपये धनगर समाजातील मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी परदेशी शिक्षणासाठी द्यायची व्यवस्था करा. आणि त्यासाठी खर्च करा घोषणा दहा हजार कोटी रुपयांची करायची आणि दोनशे तीनशे कोटीच्या पुढे खर्च होणार नाही हे समजून घ्या असेही जयंत पाटील म्हणाले.

महिलांना एसटीत सवलत दिलात ठिक आहे परंतु एसटीचा तोटा साडेदहा हजार कोटींचा आहे. ही योजना महत्वाची आहे परंतु ती चालू राहण्यासाठी १५ – १६ शे कोटी खर्च होणार आहे. महिलांसाठीची ही घोषणा यशस्वी व्हायची असेल तर पुरवणी मागण्यांमध्ये १५०० कोटी चा तरतूद करा नाहीतर ही योजना बंद पडण्याची शक्यता आहे अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

तुमच्या उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये खूप मोठा फरक आहे.असे सांगतानाच ओबीसी महामंडळाला आधीच निधी कमी दिला जातो. निधी देण्यासाठी मोघम उत्तर आहे. जातनिहाय सर्वेक्षण का करत नाही. ७१ सालानंतर प्रत्येक वर्षी जनगणना झाली आहे. जातनिहाय गणना करावी ही ओबीसी समाजाची मागणी आहे. छोटी छोटी महामंडळ तयार ५० – ६० कोटींची खिरापती वाटण्यापेक्षा तुम्ही महामंडळाऐवजी जातनिहाय सर्वेक्षण करा त्या जातीला जेवढी लोकं आहेत बजेटमध्ये डायरेक्ट तरतूद करण्याची व्यवस्था करा आणि वेगवेगळ्या विकासाच्या योजना त्यांच्यासाठी काढा असेही जयंत पाटील यांनी सुनावले.

खेडची सभा आणि धंगेकर यांचा धसका म्हणून हा अर्थसंकल्प आहे. आता यापुढे अर्थसंकल्प मांडणार नाही अशा पद्धतीने तो मांडण्यात आला. एवढा मोठा अर्थसंकल्प मांडला गेला मात्र या अर्थसंकल्पात मराठा समाजाबद्दल एक शब्द नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली.

पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे हे सरकारने विसरू नये. पंचम अमृत हे पर्यावरणपूरक विकास मात्र सरकार येताच आरेतील हजारो झाडे तोडण्याचे काम झाले. पर्यावरण पूरक ही भाषा यांच्या तोंडात म्हणजे हा एक विनोद आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

सुर्यकांत डोलसे यांची कविता जयंत पाटील यांनी ऐकवली…

‘अर्थसंकल्प कुणाचाही असो त्याला इलेक्शनचा वास असतो हेच सत्य ठसवण्याचा विरोधकांचा हट्टाहास असतो… इलेक्शनच्या केंद्रबिंदू भोवती अर्थ आणि संकल्प फिरला जातो सामान्य माणसाचा खिसा तर सगळ्याकडून मारला जातो’ …हीच भावना महाराष्ट्रात आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

गुलाबराव पाटील यांच्यासाठी कविता वाचली… सत्तेसाठी फोडाफोडी म्हणजे आपल्या लोकशाहीला बट्टा आहे… मंत्री पदासाठी तडजोडी म्हणजे ना कुणासाठी मात्र सट्टा आहे… सट्टा म्हणजे राजकीय रिस्क आहे… सट्टा म्हणजे जुगार किंवा मटका नाही एकदा आकड्यांचा संगम झाला की मग रिस्क घेतल्याचाही फटका नाही… त्यांनीच केलेल्या प्रॅक्टिकलला त्यांनीच मांडलेली थेअरी आहे… राजकीय आकडे ऐकून कल्याण आणि मुंबईला देखील घेरी आली आहे.

नवीन अर्थसंकल्पात नाही राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काही नाही. कष्टकरी, डॉक्टर ,वकील ,सीए यांच्यासाठी काही नाही. मराठवाडा ,विदर्भ ,कोकणासाठी काही नाही. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी काही नाही. सीमावर्ती भागासाठी भरीव काही नाही. झोपडपट्टी निर्मुलनासाठी काही नाही. नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी काही नाही.. या सगळ्याचा विचार केला तर वन ट्रिलियन अर्थव्यवस्था करायचे म्हणतोय. आता कुठे आहे. आपला १५-१७ ने ग्रोथ रेट वाढवण्याशिवाय पर्याय नाही. ग्रोथ रेट वाढण्याचा रोडमॅप नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर पुस्तक लिहिले परंतु अपेक्षाभंग केला. आर्थिक परिस्थिती कशी पुढे नेणार हे सांगितले नाही. अहो काम करा हजारो कोटी रुपये जाहिरातीवर खर्च कशाला करताय असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

नरहर कुरुंदकर स्मारक नांदेड येथे आहे त्याला निधी देणार आहे त्याचा आनंद आहे मात्र त्यांचे विचार काय होते ते जयंत पाटील यांनी वाचून दाखवले ‘हिंदुत्व वाद्यांच्या पिस्तुलांना काशिम रिजवी दिसला नाही, निजाम व जिनादेखील दिसले नाहीत… या पिस्तुलातील गोळी १९२० नंतर इंग्रजांच्या विरोधी झाडली गेली नाही जणू ही गोळी फक्त गांधींसाठीच होती ‘असं नरहर कुरुंदकर यांनी म्हटले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पाहतोय.. भाव लपवण्याची पध्दत आता त्यांनी आत्मसात केली आहे त्यांच्यासाठी काही ओळी ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो… आखों मे नमी, हसी लबों पर, क्या हाल है जो दिखा रहे हो… तुम इतना जो मुस्करा रहे हो… या गाण्याच्या ओळीतून जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील खंत व्यक्त केली.

दरम्यान देवेंद्र फडणवीस किंगमेकर होतील असे वाटले होते पण किंगमेकर तर दिल्लीत बसले आहेत दोन नंबरचे आहेत. दिल्लीला गेल्याशिवाय काही मिळत नाही. मात्र कितीही घोषणा केल्या तरी जनतेला भुरळ पडणार नाही असेही जयंत पाटील शेवटी म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

2 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

4 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

4 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

4 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

5 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

7 दिवस ago