महाराष्ट्र

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुलढाणा आणि पुणे (बाणेर) येथे घडलेल्या दोन विवाहितांच्या आत्महत्येच्या घटनांबाबत राज्याचे पोलीस महासंचालक यांना निवेदनातून सखोल व निष्पक्ष चौकशीचे निर्देश दिले आहेत. या दोन्ही घटना अत्यंत गंभीर व समाजाला काळीमा फासणाऱ्या असल्याचे त्यांनी नमूद केले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यासोबतच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.

पुण्यातील बाणेर येथे २७ वर्षीय विवाहितेने लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत सासरच्या कथित हुंडा मागणी व छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील २० वर्षीय विवाहितेनेही कौटुंबिक छळामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल होऊन अटक करण्यात आली असून, महिलांवरील छळ व हुंडाबळीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या घटना अत्यंत गंभीर मानल्या जात आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, या दोन्ही प्रकरणांची तातडीने व निष्पक्ष चौकशी करून आरोपपत्रात कोणतीही त्रुटी राहू नये याची दक्षता घ्यावी. खटले ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी वरिष्ठ विशेष शासकीय अभियोक्त्याची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महिला तक्रार निवारण केंद्रे व पोलीस ठाण्यातील महिला कक्ष अधिक सक्षम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे. कौटुंबिक छळाच्या तक्रारी केवळ समुपदेशनापुरत्या मर्यादित न ठेवता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कायदेशीर कारवाई करावी. महिला व बालविकास विभाग आणि पोलीस विभाग यांनी संयुक्त कृती आराखडा तयार करून जिल्हा व तालुका स्तरावर ‘भरोसा सेल’च्या बैठका नियमित घ्याव्यात, असे त्यांनी सुचविले आहे.

हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ तसेच संबंधित दंडात्मक तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष पथके नियुक्त करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तातडीने तपास सुरू करण्याबाबत अधिसूचना जारी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय शाळा, महाविद्यालये, समाजमाध्यमे व सार्वजनिक ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सुशिक्षित समाजातही हुंड्यासाठी छळाच्या घटना घडत असल्याचे या प्रकरणांवरून स्पष्ट होत असल्याने समाजमन परिवर्तनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टळावी यासाठी संबंधित आरोपींवर कठोर व उदाहरणादाखल कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago