पाबळ (सुनिल जिते): आपण शिक्षणात आघाडी घेतली असली तरी ऊस तोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित असलेली पाहायला मिळत आहेत. आपले इतभर पोट भरण्यासाठी या कामगारांना आपले गाव सोडून परगावी ऊस तोडणी करण्यासाठी यावे लागते. मात्र, या कामगारांबरोबर त्यांची चिमुरडी मुलेही वणवण भटकताना दिसत आहेत. तर काही मुले आपल्या आई-वडिलांना मदत करताना त्यांच्या हातातील उसाचे भेळे बांधताना तसेच आपल्या हातात पाठ्यपुस्तकाच्या ऐवजी कोयते घेताना दिसत आहेत. शिक्षणाचे धडे गिरवण्यापेक्षा हि मुले काम करण्यातच धन्यता मानत असल्याची सध्यस्थिती आहे.
ऊस तोडणीसाठी परगावाहून आलेल्या या मुलांना एक वेळचे जेवण मिळणे कठीण तर शिक्षण आणि बाकी सुख सुविधा मिळणे दुर्मिळच. शिरूर तालुक्यात उस तोडणीसाठी जालना, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातून हे ऊस तोडणी कामगार दाखल झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिरूर परिसरात या कामगारांच्या झोपड्या थाटलेल्या आहेत. यंदा या भागात ऊस तोडणीसाठी अनेक कारखान्यांचे मजूर आले असून, या मजुरांसोबत त्यांचे कुटुंबही दाखल झाले आहे. त्यांच्या लेकरांना ऊन, वारा, विंचू, काट्याचे भय कधी वाटतच नाही. उसाच्या फडातच ती लहानाची मोठी होतात.
कडाक्याच्या थंडीतही भल्या पहाटे कोयता हातात घेऊन फडात साऱ्यांची लगीनघाई सुरू होते. आर्थिक परिस्थितीअभावी आगामी उचल घेऊन यांचा उदरनिर्वाह चालत असतो. वर्षातील काही दिवस गावी, तर काही दिवस कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची मात्र यामध्ये अपरिमित हानी होते.
ऊसतोड मजूर मुलांच्या समस्यांमध्ये शिक्षणापासून वंचित राहणे, स्थलांतरामुळे नियमित शाळेत न जाता येणे, बिबट्याकडून जिवाला धोका आणि त्यांना आवश्यक सुविधा न मिळणे या नुकसानीचा समावेश होतो. या समस्यांवर मात करण्यासाठी राज्य सरकारने शासकीय वसतिगृह योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय, भोजनाची सोय, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य दिले जाते. परंतु या योजनेबद्दल अनेक ऊसतोड मजुरांना माहिती नाही. ही योजना तळागळापर्यंत जाणे गरजेचे आहे.
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…