अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याची कबुली माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिली. ‘मी मेंदूचा डॉक्टर आहे; पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला,’ अशी मिश्कील टिप्पणी करत त्यांनी महामार्गाच्या कामातील दिरंगाईवर भाष्य केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त देवळाली प्रवरा येथे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत डॉ. सुजय विखे-पाटील सहभागी झाले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत त्यांना प्रश्न विचारला.
यावर बोलताना विखे म्हणाले की, महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची जाणीव आहे. डिसेंबरपर्यंत नागरिकांची या त्रासातून सुटका होईल, असा दावा त्यांनी केला. युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराच्या उपलब्धतेवर परिणाम झाला असून, त्याचा विकासकामांवरही परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सिस्पे प्रकरणातील आरोपींना आपल्या कार्यकर्त्यांनी शोधून काढल्याचा दावा खासदार नीलेश लंके यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
‘डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था! पण ही नामुमकिन गोष्ट खासदारांनी केली असेल, तर त्यांना नक्कीच ‘रॉ’चे अध्यक्ष करायला पाहिजे,’ असा टोला विखे यांनी लगावला.
महामार्गाच्या कामावरून नागरिकांमध्ये नाराजी असताना सुजय विखे यांच्या या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.