वाहतूक कोंडी, अपघात आणि अडथळ्यामुळे रुग्णवाहिकांच हाल; प्रशासन गप्प!
शिरुर (अरुणकुमार मोटे): सणसवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गालगत सुरू असलेली भाजीपाला मंडई सध्या जीवघेणा प्रश्न बनली आहे. मुख्य रस्त्यालगतच बेकायदेशीर पद्धतीने उभारण्यात आलेल्या भाजीपाला दुकानांमुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः सकाळी व सायंकाळच्या वेळेस येथे प्रचंड गर्दी होते आणि या गर्दीमुळे संपूर्ण महामार्गावर वाहतूक ठप्प होते.
या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. महत्त्वाचे म्हणजे, या मार्गावरून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच पोलिसांची वाहतूक नियमितपणे असते. परंतु भाजीपाला दुकानदारांनी गटार लाईनवर अतिक्रमण करून आपली दुकाने थाटल्यामुळे या अत्यावश्यक सेवा देखील अडकतात. परिणामी, वेळेवर मदत पोहचण्यात उशीर होतो आणि त्यामुळे अनर्थ होण्याची शक्यता वाढते.
गेल्या काही महिन्यांमध्ये येथे झालेल्या अपघातांची संख्याही लक्षणीय आहे. दुचाकीस्वारांना यामध्ये सर्वाधिक धोका आहे. अचानक रस्त्यावर वळवलेली गाडी, दुकानासमोर थांबलेली वाहनं आणि चाळ-गोंगाट यामुळे रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या सर्व परिस्थितीवर स्थानिक प्रशासनाकडून कुठलीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही परिस्थिती जैसे थे आहे.
सणसवाडीतील ही मंडई केवळ भाजीपाला
खरेदी करण्याचं ठिकाण न राहता, आता ती “मृत्यूचा दुहेरी सापळा” बनली आहे. एकीकडे अपघाताचा धोका, आणि दुसरीकडे अडथळ्यांमुळे खोळंबणाऱ्या रुग्णवाहिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा ही मंडई भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटनांना निमंत्रण देईल, हे नाकारता येणार नाही.