विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! रोडरोमिओंना लगाम घालण्यासाठी दामिनी पथक सुरु करा; आयेशा सय्यद

मुख्य बातम्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष ‘दामिनी पथक’ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलीम सय्यद यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप केंजळे यांना देण्यात आले.

शहरातील शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींची दैनंदिन ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शाळा-महाविद्यालय परिसर, बसस्थानके, मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ भागात वाढलेल्या गर्दीमुळे महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी रोडरोमिओंचा वावर, छेडछाड आणि गैरवर्तनाच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महिला सुरक्षेला प्राधान्य देत शहरातील संवेदनशील व गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र ‘दामिनी पथक’ नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे पथक शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानके, बाजारपेठ आणि प्रमुख चौकांमध्ये नियमित गस्त घालून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

महिलांवरील अत्याचार, छेडछाड व अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील पालक, नागरिक आणि विद्यार्थिनींकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरात लवकर दामिनी पथक कार्यान्वित करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत