गर्दीचा फायदा घेत अनोळखी महिला चोरटीचा डाव; ९४ हजारांच्या दागिन्यावर डल्ला, गुन्हा दाखल
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदुपारी गर्दीचा फायदा घेत एका अनोळखी महिला चोरट्याने ११ ग्रॅम वजनाचे सुमारे ९४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता अशोक राऊत (वय ५०, रा. साईस्वराज्यनगर, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) या ८ जुलै रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास शिरूर बसस्थानकात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण अत्यंत चलाखीने चोरून नेले.
घटना लक्षात येताच अनिता राऊत यांनी तातडीने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिला चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.
या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात महिला चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांना लक्ष्य करून दागिने चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, बसस्थानक, बाजारपेठ आणि इतर गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने व वस्तूंची विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.