विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे निवेदन; महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी मागणी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात महाराष्ट्र शासनाने अजितदादा पवार यांच्या नावाची पद्मविभूषण (मरणोत्तर) पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
चेतन तुपे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाले आणि महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान, अभ्यासू व लोकाभिमुख नेता गमावला. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याच्या सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि सहकार क्षेत्राच्या विकासाला महत्त्वपूर्ण दिशा दिली.
अजितदादा पवार हे कणखर प्रशासक, निर्णयक्षम लोकप्रतिनिधी आणि ‘अॅक्शन ओरिएंटेड’ नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. शेतकरी, सहकार, विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि प्रशासनावरील मजबूत पकड यामुळे त्यांनी जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या राष्ट्रसेवेचा सर्वोच्च सन्मान म्हणून भारत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करावा, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रीय नेतृत्व, पक्ष संघटना, प्रशासनातील योगदान, विकासाभिमुख निर्णय, शेतकरी व सहकार क्षेत्रातील कार्य तसेच जनकल्याणासाठी केलेल्या कामांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विधानमंडळ सदस्य उपस्थित होते.