नियमित व्यायाम करण्याचे फायदे

आरोग्य

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते, मन ताजेतवाने राहते. व्यायाम हा आपला नित्यनेमाचा कार्यक्रम असला पाहिजे, मात्र तरीही नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांची संख्या कमीच आहे. पहाटे किंवा सकाळी लवकर उठून फिरायला जाणाऱ्या किंवा व्यायामाला जाणाऱ्या लोकांची संख्या ही त्या मानाने फारच कमी असते. व्यायामाचे महत्व सर्वांना समजावे म्हणून व्यायामाचे १० प्रमुख फायदे पुढे दिले आहेत.

१) सुदृढ दीर्घायुष्य लाभते

व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.

२) नितळ त्वचा, चमकदार केस, निरोगी नखे

व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच पण ते त्वचा, केस, आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्‍यांचे केस भराभर वाढतात व त्याच्यावर उत्तम चकाकी असते. अशा व्यक्तींची त्वचा नितळ असते आणि नखांची वाढ सुध्दा निरोगीपणे होत असते.

३) अवयवांचा समन्वय साधला जातो

शरीरात मेंदू, हृदय, हात, पाय इत्यादी अनेक अवयवांची जोडी (दोन) असते- डावे आणि उजवे. त्यांच्यात जेवढा चांगला समन्वय असेल तेवढा जीवनाचा दर्जा चांगला असतो. नियमितपणे व्यायाम केल्याने डाव्या आणि उजव्यामध्ये चांगला समन्वय साधला जातो.

४) शरीराची कार्यक्षमता वाढते

नियमितपणे व्यायाम करणार्‍यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते आणि त्यामुळेच त्यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.

५) मन सकारात्मक राहते 

व्यायाम करणार्‍यांची विचार करण्याची पध्दत सकारात्मक असते त्यामुळे त्यांची उत्पादकताही चांगली असते. कमी उर्जे मध्ये आणि कमी वेळे मध्ये उत्तम काम करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा आळस येत नसल्यामुळे कोणतेही काम करायला ते सदैव तत्पर असतात.

6) हाडे मजबूत बनतात

व्यायाम करणार्‍या व्यक्तीची हाडे मजबूत असतात त्यामुळे पडणे, धडपडणे, मुरगळणे, आखडणे, करक लागणे अशा गोष्टींचा त्रास त्यांना होत नाही. परिणामी अशा छोट्या छोट्या तक्रारींसाठी शारीरिक ऊर्जा वाया जाण्याचे प्रमाण त्यांच्यात कमी असते.

७) रोग प्रतिकारशक्ती वाढते

नियमित व्यायाम केल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि त्यामुळे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला, फ्ल्यू यांसारख्या होणाऱ्या संसर्गजन्य रोगापासून शरीराचा बचाव होतो. याचबरोबर कर्करोग, हृदयविकार, रक्तदाब, पित्त अशा गंभीर विकारांपासूनही मुक्ती मिळते.

८) आकर्षक प्रभावी व्यक्तिमत्त्व

व्यायाम करणाऱ्यांचे शरीर सुडौल असते. उंची, जाडी, वजन यांचा योग्य समतोल त्यांच्या शरीरात साधलेला असतो. त्यामुळे त्यांचे दिसणे हेही मोठे चैतन्यदायी असते. त्याचबरोबर त्यांच्या हालचाली डौलदार आणि सहज असतात. बेंगरुळपणाचा (आळशीपणाचा) त्यात अभाव असतो.

९) हृदयविकार मुक्ती

व्यायाम करणार्‍याचे हृदय निरोगी असते. त्यामुळे हृदयाचे ठोके सामान्य असतात. फुफ्फुसांवरही ताण पडला तर सहन होतो. त्यांचा श्‍वास चांगला असतो. अशा व्यक्तींच्या रक्तवाहिन्या निर्दोष असतात, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि त्यांना अती कमी अथवा उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही. त्यामुळे त्यांना विविध हृदयविकारांपासून मुक्ती मिळते.

१०) तणाव मुक्ती नि आत्मविश्वास

व्यायाम करणार्‍यांना तणावाचा चांगला सामना करता येतो कारण त्यांच्या शरीरातील विविध हार्मोन्सचे स्रवणे सामान्य असते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास आणि आनंद या दोन्हीत वाढ झालेली असते. ते मानसिकदृष्ट्या सुध्दा उत्तम जीवन जगत असतात

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत