चित्रनिर्मितीत AIचा वापर; २५ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा

महाराष्ट्र

मुंबई : चित्रपट निर्मिती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेऊन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चित्रनिर्मिती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २५ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यांवर AIचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन सहभागीांना मिळणार आहे.

निर्मितीपूर्व प्रक्रिया, प्रत्यक्ष निर्मिती, निर्मितीपश्चात प्रक्रिया तसेच वितरण आणि विपणन या टप्प्यांमध्ये AIच्या माध्यमातून काम अधिक परिणामकारक आणि सुलभ करण्याच्या पद्धती कार्यशाळेत समजावून सांगण्यात येणार आहेत.

AI Film Maker तेजस प्रभा विजय देऊस्कर, AI Take Expert जगजीत सिंग आणि AI Producer प्रशांत ठाकूर हे कार्यशाळेचे मार्गदर्शक आहेत. AI आधारित चित्रनिर्मिती, पटकथा लेखन, दिग्दर्शन, छायांकन, VFX, पोस्ट-प्रॉडक्शन आणि डिजिटल कंटेंट निर्मिती या विषयांवर प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन, प्रात्यक्षिके, केस स्टडी आणि संवादात्मक सत्रे होणार आहेत.

दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक, छायाचित्रकार, कॅमेरा सहाय्यक, संकलक, पोस्ट-प्रॉडक्शन तज्ज्ञ, VFX कलाकार, मोशन डिझायनर, प्रॉडक्शन डिझायनर, लेखक, पटकथाकार, स्वतंत्र चित्रपट निर्माते तसेच चित्रपट शिक्षण घेणारे विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.कार्यशाळेसाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रशिक्षणार्थी शुल्क १,००० रुपये आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत