२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या परीक्षणासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र कलाकारांनी २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे. यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धांना १६ नोव्हेंबर २०२६ पासून प्रारंभ होणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी हौशी मराठी, हौशी हिंदी, संस्कृत, संगीत नाट्य, मराठी बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य, मराठी एकांकिका आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धांसह विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
या स्पर्धांमधील नाटकांच्या परीक्षण प्रक्रियेत नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांचा अधिकाधिक सहभाग वाढविणे, तसेच त्यांच्या अनुभवाचा लाभ स्पर्धक कलाकार आणि नाट्यसंस्थांना मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी यंदा इच्छुक कलाकारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
ऑनलाइन अर्ज कुठे करावा?
नाट्य स्पर्धांच्या परीक्षणासाठी इच्छुक व पात्र कलाकारांनी २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत mahanatyaspardha.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक माहितीसाठी कलाकारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
नाट्य क्षेत्रातील पात्र व अनुभवी कलाकारांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.