दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित केला आहे. गुरुवारी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, भगवा खांद्यावर घेऊन शिवसैनिक थेट शेताच्या बांधावर पोहोचेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ठाम ग्वाही शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

येत्या मंगळवारी, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता गोरेगाव येथील नेस्को मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्धार आणि शेतकऱ्यांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी या मेळाव्याच्या केंद्रस्थानी असणार आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेचे विविध उपक्रम

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून, संकटाच्या काळात बळीराजाला एकटे पडू देणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पक्षाकडून विविध माध्यमांतून मदतीचे उपक्रम राबवण्यात येत आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी २५ हजार सायकलींचे, तर शेतकऱ्यांच्या पत्नींसाठी २५ हजार शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे. याशिवाय दसऱ्यापूर्वीच दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप आणि ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा उपक्रमही शिवसेनेकडून राबवण्यात येणार आहे.

दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या मदतीबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत. तसेच राज्यभरातील शिवसैनिकांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोणते उपक्रम राबवावेत, याबाबत राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा करण्याची अपेक्षा आहे.

संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना

गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले असताना शिवसेनेने त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. दसऱ्याचे तोरण लावण्यासाठी शिवसैनिक शेतकऱ्यांच्या घरी पोहोचले होते. लाडक्या बहिणींनाही पक्षाकडून मदतीचा हात देण्यात आला होता. दसऱ्यापूर्वीच शेतकरी कुटुंबांपर्यंत अन्नधान्याची पाकिटे पोहोचवण्यात आली होती.

यंदाही दुष्काळाच्या संकटामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी शिवसेनेकडून राज्यभर विविध उपक्रम राबवले जात आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणींच्या काळात त्यांना प्रत्यक्ष मदत मिळावी, हा या उपक्रमांमागील उद्देश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आलेल्या यंदाच्या दसरा मेळाव्यातून शेतकऱ्यांप्रती असलेली शिवसेनेची बांधिलकी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संकटग्रस्त बळीराजाला दिलासा देण्यासोबतच राज्यभरातील शिवसैनिकांना मदतकार्याची दिशा देणारा हा मेळावा ठरणार असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत