छटपूजा भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक

महाराष्ट्र

प्रत्येक समाजाच्या सण-उत्सवात सहभागी होणे हीच महाराष्ट्राची परंपरा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: छटपूजा हा केवळ धार्मिक विधी नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. उगवत्या आणि मावळत्या सूर्याची पूजा करणारा हा अनोखा सण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण देतो. आपली संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सव पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. राज्यातील प्रत्येक समाजाच्या सण-उत्सवांमध्ये सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाण्यातील रायलादेवी तलाव परिसरात आयोजित छटपूजा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी छटमातेचे आशीर्वाद सर्व नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाभावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव तथा ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे, मनोज शिंदे, एकनाथ भोईर, योगेश जानकर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणून २०२२ मध्ये जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोविड काळातील निर्बंध हळूहळू हटवून सर्व सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांना मोकळीक देण्याचा निर्णय घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली. गोपाळकाला, दहीहंडी, नवरात्रोत्सव यांसह सर्व सण उत्साहात साजरे व्हावेत, ही सरकारची भूमिका राहिली आहे. छटपूजेसारख्या परंपरांनाही सरकारकडून नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, असे ते म्हणाले.

संकटाच्या काळात राजकारण नको, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा!

राज्यातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या सोबत असून, समाजातील प्रत्येक घटकानेही मदतीसाठी पुढे यावे. संकटाच्या काळात राजकारण न करता माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

छटपूजेच्या आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व आयोजक, कार्यकर्ते आणि नागरिकांचे त्यांनी अभिनंदन केले. छटमातेचे आशीर्वाद सर्वांना लाभोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान व समृद्धी नांदो, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत