शिरुरमधील घरफोडीचा छडा; तीन चोर जेरबंद १२१ ग्रॅम सोन्यासह २०० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत 

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तांत्रिक तपासाच्या आधारे छडा लावत तीन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, असा बाजारमूल्यानुसार सुमारे १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

दिनांक १२ जुलै २०२६ रोजी शिरुर शहरातील स्टेट बँक कॉलनीमधील बीएसएनएल कार्यालयाचे लॉक तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तेथून बीएसएनएल कंपनीचे फ्रेम, मदरबोर्ड व पीसीबी चोरीस नेण्यात आले. त्याचप्रमाणे वाडा कॉलनी, शिरुर येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीस नेण्यात आले होते. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिरुर परिसरातील वाढत्या घरफोडीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्यांच्या तपास पथकांची बैठक घेऊन मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला.

तपासादरम्यान गुन्हा घडलेली ठिकाणे, वेळ, चोरट्यांची कार्यपद्धती आणि यापूर्वीच्या घटनांचा सखोल आढावा घेण्यात आला. समान कार्यपद्धतीच्या घटनांची माहिती एकत्रित करण्यात आली. घटनास्थळापासून रस्त्यालगत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. तसेच तांत्रिक विश्लेषणासाठी विशेष पथक नियुक्त करुन फिर्यादी व साक्षीदारांकडून आरोपींचे वर्णन घेण्यात आले. गोपनीय बातमीदारांकडूनही माहिती संकलित करण्यात आली.

तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर घरफोडी करणारे इसम वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासुर्णे परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार लासुर्णे परिसरात दाखल झाले. तेथे सुरज भिमा निंबाळकर (रा. डोरलेवाडी, ता. बारामती), शंकर तायप्पा घोरपडे (रा. लासुर्णे वैदवाडी, ता. इंदापूर) आणि संगाम लाला शिंदे (रा. लासुर्णे, ता. इंदापूर) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्यांनी शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरी केल्याची कबुली दिल्याने तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून त्यांच्या ताब्यात ठेवलेले चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्ती पंचनाम्याने हस्तगत करण्यात आले. आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती. सध्या तिन्ही आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले आणि बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे (सासवड), पोलीस निरीक्षक विनोद पाटील (शिरुर), सहायक पोलिस निरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब कारंडे, सहायक फौजदार शिवाजी निकम, पोलिस हवालदार अक्षय यादव, महेश खरात, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, पोलिस शिपाई रहीस मुलाणी, सहायक फौजदार संजय पड्याळ, पोलिस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीन, विकास पाटील, पोलिस शिपाई सागर धुमाळ तसेच सासवड पोलीस ठाण्याचे पोसई परमेश्वर गोडसे, पोलिस शिपाई तुषार लोंढे व प्रविण शेंडे यांनी सहभाग घेतला.

या आरोपींनी इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले असून, इतर आरोपींचा शोध सुरु आहे. चोरीच्या मालमत्तेचा अधिक तपास तसेच या टोळीने आणखी काही घरफोड्या केल्या आहेत का, याबाबत शिरूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत