खाकी वर्दीतील पोलिसच निघाला ड्रग्स रॅकेटचा दरोडेखोर

मुख्य बातम्या शिरूर तालुका

गुजरच्या ‘श्याम’ चे सुंदर कारनामे होणार उघड

शिरूर (अरुणकुमार मोटे): केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाला मोठा धक्का देणारे आणि संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणेला हादरवून सोडणारे एक धक्कादायक प्रकरण पुणे ग्रामीण जिल्ह्यात शिरूर येथे उघडकीस आले आहे. शिरूर तालुक्यात तब्बल वीस कोटी रुपये किमतीच्या एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्स प्रकरणात थेट पोलीस कर्मचारीच मास्टरमाइंड असल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ड्रग्स बरोबरच त्याचे अनेक काळे धंदे समोर आणण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) दि. १७ जानेवारी रोजी शिरूर तालुक्यात कारवाई करत शहादक शेख (रा. शिरूर) या गॅरेज चालकाला अटक केली. त्याच्याकडून सुमारे एक किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल दोन कोटी रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहादक शेखच्या चौकशीतून या ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे पारनेर तालुक्याकडे वळले. त्यानंतर पुणे एलसीबीने माऊली शिंदे (रा. कोहकडी ता. पारनेर) याला ताब्यात घेतले. माऊली शिंदेकडून तब्बल ९ किलो ६५५ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.

या दोन कारवायांमधून एकूण १० ते ११ किलो एमडी ड्रग्स जप्त झाले असून, एवढा मोठा साठा पुरवणारा कोण, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला.माऊली शिंदेच्या सखोल व तांत्रिक तपासात त्याने दिलेल्या जबाबातून पोलिसांनाही धक्का बसला.

हा ड्रग्सचा माल अहिल्यानगर (नगर) जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस कर्मचारी श्यामसुंदर विश्वनाथ गुजर याच्याकडून मिळाल्याची कबुली माऊली शिंदेने दिली.

यानंतर पुणे एलसीबीने तातडीने मोबाईल कॉल डिटेल्स व लोकेशन ट्रॅकिंग केले असता, माऊली शिंदेने सांगितलेली सर्व ठिकाणे व तारखा गुजरच्या हालचालींशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले.पुणे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दि. २० जानेवारी रोजी पहाटे पुणे एलसीबीचे पथक अहिल्यानगर येथे दाखल झाले.

नगर एसपी कार्यालय परिसरातील एलसीबी कार्यालयातून श्यामसुंदर गुजर याला ताब्यात घेण्यात आले. निरीक्षण कक्षात नोंद करून त्याला थेट शिरूरला आणण्यात आले.

गुजरला अटक झाल्याची माहिती मिळताच नगर सह महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडाली. “ड्रग्स विरोधी कारवाई करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेतीलच पोलीस कर्मचारी ड्रग्स रॅकेट चालवत होता,” यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले.

श्यामसुंदर गुजर याचा सेवाकाळ आधीपासूनच वादग्रस्त राहिला आहे. तो पूर्वी पारनेर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होता. त्या काळात मावा, गुटखा तस्करांशी संगनमत, तसेच अवैध धंदेवाल्यांकडून जादा हप्ते उकळल्याच्या तक्रारी त्याच्याविरुद्ध दाखल झाल्या होत्या

त्याच्या बदलीसाठी पारनेर तालुक्यातून वरिष्ठांकडे अनेक निवेदनेही देण्यात आली होती. अखेर त्याची बदली झाली; मात्र आश्चर्य म्हणजे एवढा वादग्रस्त पोलीस कर्मचारी असूनही त्याला थेट स्थानिक गुन्हे शाखेत पोस्टिंग देण्यात आली.

जप्त मुद्देमालातून १० किलो एमडी गायब

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, नगर एलसीबीने काही दिवसांपूर्वी जप्त केलेल्या २५ किलो एमडी ड्रग्समधून तब्बल १० किलो ड्रग्स गायब झाल्याचे तपासात पुढे आले आहे.

हा मुद्देमाल ज्या कक्षात ठेवण्यात आला होता, त्या कक्षाची जबाबदारी गुजरकडे होती. त्याने चालाखीने १० किलो एमडी काढून त्याऐवजी मैदा भरल्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.मुद्देमाल कक्षावर एसपी व पीआय यांचे नियंत्रण असतानाही,एवढा मोठा माल बाहेर कसा गेला?कोणाच्याही लक्षात कसे आले नाही?

तपासात ही अफरातफर कशी उघड झाली नाही?

असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गेल्या महिन्यात संगमनेरचे आमदार अमोल खताळ व श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी नगर पोलिसांतील भ्रष्टाचारावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते.

आता या ड्रग्स प्रकरणामुळे त्यांच्या आरोपांना प्रत्यक्ष पुराव्यांसह दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे केवळ पोलीस दलातच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे.दोषींना कठोर शिक्षा व्हावी, संपूर्ण ड्रग्स साखळी उघड व्हावी आणि कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्ष तपास व्हावा, अशी अपेक्षा नगरकर व पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.

गुजरचा साथीदार माऊली शिंदे याचा भाऊ हनु शिंदे हा या प्रकरणात सामील असून त्याला का अभय दिले जाते? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुजर बरोबर तो अनेक काळ्या धंद्यात त्याचा साथीदार असून अनेक काळे धंदे त्याला अटक केल्यास समोर येणार आहे. हनु तसेच शिंदे याच्यावर गुजरात मध्ये अवैध दारू विक्री व वाहतुक प्रकरणी गुन्हे दाखल असून इतर गंभीर गुन्हेही दाखल असल्याची चर्चा पारनेर तालुक्यात होत आहे. त्याला ताब्यात घेतल्यात गुजरच्या श्यामसुंदरचे सुंदर कारनामे व काळे धंदे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे