मूळव्याध म्हणजे काय

आरोग्य

मूळव्याधला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात. हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्या ठिकाणी सूज येते. यामुळे, गुद्द्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक पाईल्सला त्रस्त आहेत. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी यावर वेळीच उपचार करणे महत्वाचे असते. या समस्येत शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज येते. तसेच शौचाच्या ठिकाणी खाज होणे, आग होणे, जळजळ आणि भयंकर वेदना होतात. त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तसुद्धा जाते.

कारणे

मुळव्याध त्रास होण्यासाठी अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने चुकीचे खानपान, बद्धकोष्ठता, सततचे बैठे काम, कुटुंबात पाईल्सची अनुवंशिकता असणे, प्रेग्नन्सी आणि लठ्ठपणा असल्यास पाईल्सची समस्या होऊ शकते.

लक्षणे

मूळव्याध समस्येत गुदाच्या शिरांना सूज येते, त्याठिकाणी कोंब किंवा मोड येतात. गुदाच्या ठिकाणी भयंकर वेदना होणे, खाज येणे, जळजळ व आग होणे अशी लक्षणे असतात. शौचाच्या वेळी त्रास अधिक वाढतो. काही वेळा शौचातुन रक्तही जाते. अधिक प्रमाणात रक्त जाण्यामुळे ऍनिमिया होऊ शकतो.

प्रकार

अंतर्गत पाईल्स हे गुदाच्या आत होतात. शौचाच्यावेळी इंटर्नल पाईल्सचे कोंब बाहेर येतात आणि नंतर पुन्हा आत आपल्या जागेवर जातात. इंटर्नल पाईल्सचे चार ग्रेड मध्ये वर्गीकरण केले जाते.

पहिली ग्रेड 

यातून रक्त येऊ शकते, मात्र यातील कोंब गुदाच्या ठिकाणी बाहेर येत नाहीत.

दुसरी ग्रेड 

शौचाच्यावेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात आणि पुन्हा आत आपल्या जागी जातात.

तिसरी ग्रेड

शौचाच्यावेळी या प्रकारचे कोंब बाहेर येतात, मात्र ते आपोआप पुन्हा आत जात नाही. ते आत जाण्यासाठी हाताने ढकलावे लागतात.

चौथी ग्रे

या प्रकारचे कोंब हे सतत बाहेर आलेले असतात. ते ढकलूनही आत जात नाहीत. हे कोंब जास्त सुजलेले आणि वेदनादायक असतात.

उपचार

मूळव्याधचा प्रकार, स्थिती यावर उपचार अवलंबून असते. सुरवातीच्या त्रासात जीवनशैलीतील बदल, योग्य आहार आणि औषध उपचार याद्वारे मूळव्याध पासून सहज सुटका करता येते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास अधिक वाढतो. अशावेळी मात्र औषधोपचार बरोबरच काहीवेळा शस्त्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. मूळव्याधवर अनेक आयुर्वेदिक व ऍलोपॅथिक औषधे गोळ्या, काढा आणि क्रीम स्वरूपात उपलब्ध आहेत. यांमुळे मूळव्याध त्रासातील सूज, वेदना, खाज येणे, रक्त पडणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)