सहा वर्षे आश्वासनांची मालिका, ‘स्टॉप पेमेंट’ धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर आरोप
मुंबई: “म्हाडाचे घर मिळवून देतो” या आमिषाने बँक ऑफ बडोदाचे निवृत्त हेड कॅशियर सूर्यकांत रघुनाथ म्हसकर यांची तब्बल 29 लाख रुपयांची कथित फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी किन्नरी ठाकूर, अनिल आगवणे आणि नागदेव भार्गव राणे यांच्याविरुद्ध शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0398/2026 दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, प्रभादेवी येथील म्हाडाची सदनिका मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीचा विश्वास संपादन केला. यासाठी नोटरीकृत एमओयू, विविध कागदपत्रे तयार करण्यात आली तसेच म्हाडा कार्यालयात नेऊन अधिकाऱ्यांची भेटही घडवून आणण्यात आल्याचा आरोप आहे.
नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2023 दरम्यान चेक व आरटीजीएसद्वारे आरोपींना एकूण 29 लाख रुपये देण्यात आले. एका वर्षात सदनिका मिळेल, असे सांगितले गेले. मात्र, कोरोना, निवडणुका, अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि राजकीय संपर्क अशा विविध कारणांचा आधार घेत व्यवहार वारंवार लांबविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय, फिर्यादींच्या पत्नीच्या नावाने म्हाडाकडे कथितपणे खोटी माहिती असलेले अर्ज सादर करून त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सदनिका मिळण्याची आशा संपल्यानंतर फिर्यादींनी पैसे परत मागितले असता आरोपींनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे चार पोस्ट-डेटेड धनादेश दिले. मात्र, जानेवारी 2026 मध्ये हे धनादेश बँकेत जमा केल्यानंतर ‘स्टॉप पेमेंट’मुळे ते न वटल्याचे समोर आले. त्यानंतर व्हॉट्सअॅपवरून “थोडा वेळ द्या, पैसे परत करू,” असे संदेश पाठवून वेळकाढूपणा केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, खोटी कागदपत्रे वापरणे, अपहार आणि संगनमत यांसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक अंकुश चौगुले पुढील तपास करत आहेत.