मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व सविस्तर चर्चा पार पडली असून, सर्व निवडणुका एकसंघपणे लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी दिली.
गांधी भवन येथे झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीत Vijay Wadettiwar, Satej Patil, Supriya Sule, Anil Parab, Anil Desai, Milind Narvekar यांच्यासह उमेदवार अंबादास दानवे उपस्थित होते. तसेच दूरध्वनीद्वारे Uddhav Thackeray व Ramesh Chennithala यांच्याशीही चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी २०१९ मध्ये भाजपच्या कथित लोकशाहीविरोधी धोरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन झाल्याचे सांगितले. ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’द्वारे संविधान रक्षण, महाराष्ट्रधर्म व पुरोगामी मूल्यांचे जतन करण्याची बांधिलकी आघाडीने व्यक्त केल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपवर टीका करताना त्यांनी सत्तेचा गैरवापर, दडपशाही आणि संस्थांचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला. “५० खोके, एकदम ओके” सारख्या घोषणांमुळे राज्यातील राजकारणात पैशाचे व सत्तेचे गलिच्छ स्वरूप पुढे आल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संधी दिल्यानंतर आता विधान परिषदेत शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळत असल्याचे सांगत, आगामी काळात काँग्रेसलाही योग्य प्रतिनिधित्व देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय माघार नसून परस्पर सामंजस्यातून घेतलेला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित रणनीती आखणार असल्याचा पुनरुच्चार करत, भाजप व महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गटाविरुद्ध राजकीय लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार मविआ नेत्यांनी व्यक्त केला.