मुंबई: सांगली जिल्ह्यातील पालूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
ही मदत भारती विद्यापीठाच्या स्व. डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधी तर्फे देण्यात आली आहे.यावेळी डॉ. कदम म्हणाले, “शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि त्यांच्या संकटकाळात आपण त्यांच्यासोबत राहिले पाहिजे, हा विचार माझे वडील स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी नेहमी जपला. त्या परंपरेला पुढे नेत आम्ही ही मदत दिली आहे.”
ते पुढे म्हणाले, “या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना नव्याने उभे राहण्यासाठी बळ देण्यासाठी भारती परिवार सदैव तत्पर राहिला आहे.”या भेटीत राज्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी विस्तृत चर्चा झाली.यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी आणि कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप उपस्थित होत्या.