‘मुस्लिम आरोपी टाइम बॉम्ब, तर इतर आरोपी फुलबाजा का?’; महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले
मुंबई: गुन्हेगारीला कोणताही धर्म नसतो, ती एक मानवी प्रवृत्ती आहे. मात्र, गुन्हेगाराच्या धर्मावरून त्याची ओळख ठरवणे आणि विशिष्ट धर्माला लक्ष्य करणे हे भारतीय संविधानातील समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुतेच्या मूल्यांच्या विरोधात आहे. मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला ‘टाइम बॉम्ब’ ठरवायचे आणि इतरांनी गुन्हा केला तर त्याला ‘फुलबाजा’ म्हणायचे, असे दुहेरी निकष भाजपकडून जाणीवपूर्वक राबवले जात आहेत, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी केला आहे.
कुर्ला येथे तरुण मुलामुलींना काही व्यक्तींनी केलेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असून, या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. मात्र, राज्यात अशा अनेक घटना घडत असताना केवळ निवडक घटनांना धार्मिक रंग देऊन राजकीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करणे तितकेच चुकीचे आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील ढासळती कायदा आणि सुव्यवस्था ही गंभीर चिंतेची बाब बनली आहे. बॉलिवूडमध्ये निर्माण झालेली दहशत असो किंवा पुणे, ठाणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांत घडणाऱ्या गुन्हेगारी घटना असोत, राज्यातील परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होते. महिलांवरील अत्याचारांच्या घटनाही उघडपणे घडत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असेही त्यांनी म्हटले.
गुन्हेगाराचा धर्म पाहण्याऐवजी त्याने केलेला गुन्हा पाहिला पाहिजे. गुन्हेगारीचा बिमोड करून कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. असे झाले तरच एकेकाळी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आदर्श मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा उजळू शकेल. अन्यथा, भाजपच्या राज्यात ‘बिहार बरा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
राज्यातील गुन्हेगारी, महिलांची सुरक्षा आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजप सरकारला थेट लक्ष्य केले असून, सचिन सावंत यांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.