मी मामाच्या पुढे कधीही जाणार नाही: आमदार सत्यजित तांबे 

महाराष्ट्र राजकीय

राजकारणापेक्षा नात्याचा सन्मान महत्त्वाचा 

संगमनेर: माझ्यात आणि मामांमध्ये कुठेही दुरावा नाही. मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही, जाणारही नाही. हे माझे आयुष्यभराचे तत्त्व आहे’, अशा भावनिक शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या नात्यांची परखड मांडणी केली.माजी मंत्री बाळासाहेब थोरात त्यांचे सख्खे मामा आहेत, याचा उल्लेखही त्यांनी विशेषत्वाने केला.

गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे आणि माजी मंत्री थोरात यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या; मात्र या चर्चांना पूर्णविराम देत तांबे म्हणाले, की ‘माझ्या राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा माझे कुटुंब, माझे नाते आणि त्यांचा सन्मान मला अधिक महत्त्वाचा वाटतो. मी कधीही कुटुंबाची रेषा ओलांडून राजकारण करणार नाही, हे मी राजकारणात प्रवेश करतानाच ठरवले आहे. माझा आणि माझ्या वडिलांचा राजकारणात प्रवेश हा केवळ बाळासाहेब थोरात यांना, म्हणजेच माझ्या मामांना मदत करण्यासाठी झाला आहे. आमच्यापेक्षा त्यांची महत्त्वाकांक्षा आम्हाला अधिक महत्त्वाची वाटते. त्यामुळे आमच्यात दुरावा निर्माण होण्याचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही. ते आमच्या कुटुंबाचे आणि राजकीय आयुष्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या मार्गाशी विसंगत पाऊल उचलण्याचा प्रश्‍नच नाही.

संभ्रम दूर

तांबे यांचे हे वक्तव्य केवळ राजकीय मतप्रदर्शन नसून, राजकारणात नात्यांचा सन्मान आणि कौटुंबिक मूल्यांची जपणूक कशी करावी, याचे आदर्श उदाहरण ठरते. यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणातील संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे.

लाईन क्रॉस करणार नाही

सध्या काही पक्षीय चर्चांमुळे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्या गोष्टी वेगळ्या आहेत. आमचे वैयक्तिक व कौटुंबिक संबंध प्रेमाचे, विश्‍वासाचे आणि दृढ आहेत. कोणीही ते दूषित करू शकत नाही, हे मी ठामपणे सांगतो. राजकीयदृष्ट्या मी कधीही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची लाईन कधीही क्रॉस करणार नाही आणि इथून पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत राहीन, असेही तांबे यांनी सांगितले.