मुंबई: गेल्या आठवड्यात विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यापासून राज्यात विविध राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कथितपणे सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरांतून टीका होत आहे. तसेच अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनीही टिप्पणी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) रोहित पवार यांनी काल ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी राज्यात ६००० कोटींचा आरोग्य घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. रोहित पवार यांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.