शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र शिरुर शहरात मात्र अनेक वाहनचालक नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र दिसत आहे. विना नंबरच्या दुचाकी-चारचाकी, वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही रस्त्यावर धावणारी वाहने आणि चारचाकीच्या काचांना नियमबाह्य काळी फिल्मिंग करुन फिरणाऱ्या वाहनचालकांवर अखेर शिरुर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
शिरुर शहरातील सिटी बोरा कॉलेज, बी. जे. कॉर्नर आणि पाबळ चौक या तीन महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनांची कसुन तपासणी केली. या कारवाईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर तब्बल २५७ केसेस करण्यात आल्या असून, ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शिरुर शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक विना नंबरची वाहने बिनधास्तपणे फिरताना दिसतात. काही वाहनचालकांकडे आवश्यक कागदपत्रे नसतात, तर काहीजण वैध वाहनचालक परवान्याशिवाय वाहने चालवित असल्याचे आढळते. चारचाकी वाहनांच्या काचांना काळी फिल्मिंग करुन वाहनाच्या आतील भागाचे दृश्य झाकण्याचे प्रकारही सुरु आहेत. अशा प्रकारांमुळे वाहतूक सुरक्षेबरोबरच वाहनांची ओळख पटविण्याच्या दृष्टीनेही अडचणी निर्माण होऊ शकतात.
या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झालेल्या असतानाच पोलिसांनी अचानक केलेल्या या नाकाबंदीमुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी वाहन थांबवून कागदपत्रे, परवाना, नंबर प्लेट तसेच इतर आवश्यक बाबींची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईचा सर्वात मोठा धक्का विना नंबरची वाहने चालविणाऱ्यांना बसला आहे. वाहन खरेदी केल्यानंतर नंबर प्लेट न लावता रस्त्यावर वाहन चालविण्याची बेफिकीर वृत्ती अनेकांकडून दिसून येते. काही जणांकडून वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वाहने चालविली जातात. अशा प्रकारच्या बेफिकीरपणामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, हा गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहे.
या धडक कारवाईत शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले, पोलिस निरीक्षक विनोद पाटील, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सागर शेळके, राकेश मुळीक यांच्यासह सुमारे ४५ ते ५० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
कारवाई सातत्याने होणार का…?
एका दिवसाच्या नाकाबंदीपेक्षा अशा प्रकारची कारवाई सातत्याने होणे गरजेचे आहे. शहरातील प्रमुख चौक, महाविद्यालय परिसर आणि गर्दीच्या रस्त्यांवर विना नंबरची वाहने, विनापरवाना चालक आणि नियमबाह्य फिल्मिंग करणाऱ्या वाहनांवर नियमितपणे कारवाई झाल्यास वाहतूक शिस्त निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल.
शिरुर पोलिसांच्या या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालविणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. रस्त्यावर वाहन आणताना नंबर प्लेट, वैध परवाना आणि आवश्यक कागदपत्रे असणे ही ‘पर्यायाची’ बाब नसून कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे यापुढेही नियम मोडून वाहन चालविणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई होणार का, याकडे शिरुरकरांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांची कारवाई झाली म्हणून नियम पाळायचे नव्हे; तर कारवाईची गरजच पडणार नाही, इतकी वाहतूक शिस्त प्रत्येक वाहनचालकाने स्वतःहून पाळणे गरजेचे आहे. विना नंबरची वाहने, विनापरवाना चालक अन् काळ्या फिल्मिंगविरोधात पोलिसांची धडक कारवाई यापुढेही अशीच सुरु राहणार असुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची कुठलीच गय केली जाणार नाही.
रविंद्र भोसले (DYSP)
उपविभागीय अधिकारी
शिरुर