शेती रस्त्यावरून चाललेल्या वादावर तहसीलदारांच्या मध्यस्थी मुळे तोडगा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

चार तासांच्या संघर्षानंतर रस्ता खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मौजे निमोणे येथील भोस वस्तीवर हिंगे, भोस आणि अन्य शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या रस्त्यावरून गेली अनेक वर्षे वाद सुरू होता. या वादामुळे शेतीकामांसह वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या संदर्भात वादी लताबाई भास्कर हिंगे यांनी शिरूर तहसील कार्यालयात लेखी अर्ज दिला होता. त्यावर काही दिवसांपूर्वी तत्कालीन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी स्वतः स्थळ पाहणी करून निर्णय देण्यासाठी पुढाकार घेतला होता.

पुन्हा दि. १८ जून २०२५ रोजी बुधवारी, शेवटी तहसीलदार म्हस्के यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सुमारे ५० मीटर लांबीचा अडविलेला शेती रस्ता खुला करून दिला. मात्र, या दरम्यान वादी व प्रतिवादींमध्ये मोठा वाद निर्माण झाला. प्रतिवादींच्या बाजूने काही महिलांनी JCB समोर ठिय्या दिला आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सलग दोन तास तणावपूर्ण वातावरण होते. शेवटी तहसीलदारांनी कठोर भूमिका घेत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 353 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.

नंतर मंडल अधिकारी नंदकुमार खरात, ग्राम महसूल अधिकारी हर्षद साबळे, शिरूर पोलीस ठाण्याचे अंमलदार व महिला पोलिस यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. या घडामोडींनंतर उपस्थित नागरिकांना पुढील कायदेशीर परिणामांची जाणीव होऊ लागली. याचदरम्यान “शेत रस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्ते कृती समिती”च्या मध्यस्थीने दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणला आणि अखेर वाद शांत झाला.

या रस्त्याच्या कामासाठी आणि समेटासाठी शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे व दादासाहेब जंगले यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृती समितीच्या ॲड. सुप्रिया साकोरे, रवींद्र खुडे, निवृत्त पोलिस अधिकारी नानासाहेब काळे, प्रकाश वाखारे, फैजल पठाण, रवींद्र वाखारे, बाळासाहेब भोस, सोमनाथ गिरमकर, नाना कोहकडे यांच्यासह वादी-प्रतिवादी पक्ष आणि गावातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संघर्षमधून समजते की, स्थानिक प्रश्नांवर प्रशासन, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केल्यास सुटणं शक्य आहे. तसेच महसूल प्रशासनाने स्पष्ट केले की, यानंतर मागणीनुसार अन्य अडवलेले रस्तेही टप्प्याटप्प्याने खुले केले जातील.निमोणे गावात एक जुना वाद तहसीलदारांच्या प्रयत्नांमुळे आणि कृती समितीच्या मध्यस्थीमुळे सकारात्मक मार्गी लागला. ही घटना इतर गावांतील अशा वादांवर उपाय कसा शोधावा याचे उदाहरण ठरते.