सॉरी बाबा मला जमलं नाही’, MBBS विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

क्राईम महाराष्ट्र

मुंबई: सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यानं गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी घडलेल्या या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळी सुसाइड नोट सापडलीय. त्यात माझ्याकडून झालं नाही, मला माफ करा बाबा असं लिहिलंय. २४ वर्षीय हिमांशु कश्यप हा कॉलेज कॅम्पस परिसरात असणाऱ्या हॉस्टेलमध्ये राहत होता. हॉस्टेलमधील खोलीतच त्यानं गळफास घेत आयुष्य संपवलं. परीक्षेच्या दिवशीच त्यानं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. परीक्षा असूनही हिमांशू उठला नसल्यानं त्याच्या मित्रांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. दरवाजा आतून बंद असल्यानं तोडून आत प्रवेश केला असता हिमांशूचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

हिमांशूच्या आत्महत्येची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याच्या खोलीची झडती घेण्यात आली. त्यात एक सुसाइड नोट आढळून आली आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी तपास केला जात आहे. कॉलेजच्या अधीक्षकांनी सांगितलं की, हिमांशू २०२४ मध्ये फर्स्ट इयरच्या परीक्षेत नापास झाला होता. त्यामुळे तो यंदा पुन्हा परीक्षा देत होता. मात्र परीक्षा देण्याच्या आधीच त्यानं गळफास घेतला.

हिमांशूने तीन पेपर दिले होते. शनिवारी चौथा पेपर होता. पण परीक्षेला तो उपस्थितच राहिला नाही. त्यावेळी त्याचा शोध घेण्यासाठी गेल्यावर सगळा प्रकार उघडकीस आला. हिमांशूने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आलीय. हॉस्टेलमध्ये जवळपास १५० विद्यार्थी राहत असून त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.