१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम
मुंबई: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या राजकारणात संघर्ष पेटला आहे. सत्तेच्या जोरावर निवडून आलेल्या संचालकांना बाजूला ठेवण्याचे, त्यांना परराज्यात नेण्याचे आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील बहुमताचे गणित बिघडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी संचालकांना परराज्यात का नेण्यात आले, याचे स्पष्टीकरण द्यावे, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
१० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व निवडून आलेल्या संचालकांना उपस्थित राहून मतदान करण्याची संधी मिळाली पाहिजे. बहुमताच्या आधारावर अध्यक्ष निवडला जावा. मतदानाचा अधिकार असलेल्या संचालकांना मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कशासाठी? मागच्या दाराने सत्ता मिळवण्याचा हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.
गोकुळच्या या लढाईत काँग्रेस सतेज पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभी आहे. दूध उत्पादक सभासदांनी दिलेल्या कौलाचा अनादर सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. महायुतीकडून लोकशाहीच्या तत्त्वांनाच हरताळ फासला जात असून, निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या बहुमताचा अनादर करून संस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा केवळ गोकुळ दूध संघाचा प्रश्न नसून सहकार क्षेत्राची स्वायत्तता आणि लोकशाही वाचवण्याची लढाई असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचाच लोकशाही वाचवा मोर्चा!’
सत्ताधाऱ्यांच्या लोकशाहीविषयक भूमिकेवरही वडेट्टीवार यांनी जोरदार निशाणा साधला. लोकशाहीची हत्या करणारे सत्ताधारी आता लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढत आहेत. सत्तेत बसून अराजकता माजवणारेच काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. हा तर रावणांचा मोर्चा आहे, असा बोचरा टोला त्यांनी लगावला.
दिया मिर्झांच्या आडनावावरून टीका; धार्मिक तेढीवरून भाजपला सवाल
देशात धार्मिक तेढ निर्माण करून जनतेचे लक्ष महागाई, बेरोजगारी यांसारख्या मूळ प्रश्नांपासून विचलित करण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. अभिनेत्री दिया मिर्झा यांनी मांडलेल्या भूमिकेवर त्यांच्या आडनावाचा आधार घेऊन टीका करण्यात आली आणि त्यांचा व्हिडीओ काढण्यात आला, असे ते म्हणाले. एखाद्या व्यक्तीचे आडनाव पाहून तिची भूमिका ठरवणे आणि हिंदू-मुस्लिम असा भेद निर्माण करणे देशाच्या एकात्मतेसाठी घातक आहे. राहुल गांधी सत्य बोलत असल्याने त्यांच्यावर टीका केली जाते; मात्र देशात अराजकता कोण निर्माण करत आहे, याचे उत्तर भाजपने द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांचा दुटप्पीपणा उघड!
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरूनही वडेट्टीवार यांनी भाजपला धारेवर धरले. अशा वेळी भाजपमधील धर्मरक्षक कुठे लपून बसले आहेत? तेव्हा देव, धर्म आणि हिंदूंच्या भावना दिसल्या नाहीत का? दुसऱ्यांनी काही बोलले की अंगावर धावून जायचे आणि देवतांबद्दल अवमानकारक वक्तव्ये झाली की गप्प बसायचे, हा दुटप्पीपणा कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.
प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे मत मिळवण्याचे किंवा देणग्या गोळा करण्याचे साधन नाहीत. धर्माचा वापर सत्ता मिळवण्यासाठी आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी करू नये, अशी सडकून टीका वडेट्टीवार यांनी केली.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता सहकारातील लोकशाही, धार्मिक ध्रुवीकरण आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेपर्यंत पोहोचला आहे. १० नोव्हेंबरच्या निवडणुकीत संचालकांना मतदानाची संधी मिळते का आणि अध्यक्षपदाची निवड बहुमताच्या आधारे होते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.