चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

महाराष्ट्र

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि ७ कार्यशाळांचे आयोजन

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह चित्रपटप्रेमींना दर्जेदार कलाकृतींचा अनुभव देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवा’च्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवारी मंत्रालयात करण्यात आले. येत्या १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाची माहिती, कार्यक्रमांचे तपशील आणि सहभाग नोंदणीसाठी www.chitrapataka.com हे अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

यंदाच्या महोत्सवात जवळपास ३५ आशयघन मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती, ७ कार्यशाळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांची मेजवानी चित्रपटप्रेमींना अनुभवता येणार आहे. महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि प्रेक्षकांना ऑनलाइन नोंदणी करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हे डिजिटल व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे.

संकेतस्थळाच्या लोकार्पणप्रसंगी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार

महोत्सवासाठी जमा होणारे नोंदणी शुल्क राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी केली. कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा शासनाचा प्रयत्न असून अधिकाधिक चित्रपटप्रेमींनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून सिनेप्रेमींनी महोत्सवाशी जोडले जाऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असेही ते म्हणाले.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी संकेतस्थळ निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन महोत्सवाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे, कार्यक्रमांशी प्रेक्षकांना जोडणे आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, या उद्देशाने संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून महाराष्ट्रासह देश-विदेशातील मराठी चित्रपटप्रेमींना महोत्सवाशी संबंधित माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

महोत्सवाचे स्वरूप, चित्रपटांची यादी, कार्यक्रमांचे वेळापत्रक, विशेष उपक्रम आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असेल. इच्छुक प्रेक्षकांना ऑनलाइन शुल्क भरून सहभाग नोंदणीही करता येणार आहे.

यंदाच्या महोत्सवातील ‘पुस्तक ते सिनेमा’ हा विशेष उपक्रम लक्षवेधी ठरणार आहे. सिनेमाच्या माध्यमातून सादर करण्याची क्षमता असलेल्या प्रकाशित पुस्तकांच्या लेखकांना चित्रपटकर्मी, निर्माते आणि पटकथाकार यांच्याशी संवाद साधण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे.

याशिवाय १८ ते २५ वयोगटातील तरुणांसाठी ‘महाराष्ट्र माझ्या नजरेतून…’ या विशेष लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जनोंदणी आणि आवश्यक माहिती बुधवारपासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत, लेखक, निर्माते आणि नवोदित चित्रपटकर्मींना एकत्र आणण्याबरोबरच मराठी सिनेमाला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘चित्रपताका’ महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे चित्रपटप्रेमींनी www.chitrapataka.com या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत