शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर- आंबेगाव तालुक्यांना जोडणारा आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या (गायमुख फाटा ) मार्गे अवसरी – पारगाव -जांबूत – पिंपरखेड मार्गे शिक्रापूर या रस्त्याच्या रुंदीकरणासह सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामासाठी सुमारे ४१६ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सुरू केलेले जांबूत – पिंपरखेड काठापूर या रस्त्याचे काम सद्यस्थितीत बंद पडले असून ऐन पावसाळ्यात उकरून ठेवलेला काठापूर- पिंपरखेड जांबुत रस्ता चिखलमय होऊन निसरडा झाल्याने रस्त्यावरून प्रवास करताना अनेक छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडत असल्याने संबंधित अधिकारी ठेकेदार यांनी रस्त्याचे बंद पडलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी जांबुत, पिंपरखेड, काठापूर ग्रामस्थांनी केली असून रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता असून अडचण ,नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .पुढील पंधरा दिवसांत तात्काळ या रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शांताराम वरे व ग्रामस्थांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास सुविधा महामंडळ (MSIDC )च्या माध्यमातून गायमुख – पारगाव –पिंपरखेड- जांबुत शिक्रापूर हा रस्ता रुंदीकरणासह सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे. जांबुत – पिंपरखेड – काठापूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पाच महिने झाले सुरू आहे.पूर्वीचा डांबरी रस्ता दोन्ही बाजूने पूर्णपणे खोदून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे.जांबुत ते पंचतळे या रस्त्याचे एका बाजूच्या लेनचे अर्धवट सिमेंट काँक्रिट करण्यात आले असून उकरलेल्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली दिसून येते .
या आधीचा रस्ता उकरल्याने त्यावरील डांबर पूर्णपणे नामशेष होऊन मातीचा थर पूर्णपणे वर आलेला असून रस्त्याची अवस्था पाहता त्यावर मुरूम टाकणे गरजेचे असताना रस्त्याचे कामच बंद आहे. ऐन पावसाळ्यात शालेय विद्यार्थी, नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अधूनमधून हलक्या पावसाची रिपरिप कधी रिमझिम पाऊस येत असल्याने काठापूर -पिंपरखेड -जांबुत भागातील संपूर्ण रस्ता चिखलमय होऊन अनेक ठिकाणी निसरडा बनल्याने प्रवास करताना वाहनचालक व दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुचाकी घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत.अधिकारी यांनी संबंधित ठेकेदार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा त्यांचेकडून फोन घेतले जात नसल्याने कामाच्या बंद परिस्थितीबाबत समर्पक माहिती मिळत नाही. मात्र संबंधित प्रशासनाने योग्य सूचना देऊन उपाययोजना करुन रस्ता वाहतूकीस सुरळीत करून बंद असलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली जात असून याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचेकडून तथ्यहीन उत्तरे दिली जात असल्याचे समजते.
पुढील एक महिन्यातच ऊस तोडणी हंगाम सुरू होण्याची शक्यता असून या भागातील सर्वाधिक प्रमाणावर ऊस वाहतुकीसाठी या मार्गाचा वापर होत असून आज स्थितीत आता रस्त्याचे काम करणे सोयीस्कर असताना संबंधित ठेकेदार यांनी अर्धवट काम केले असून साखर कारखाना सुरू झाल्यावर बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक द्वारे ऊस वाहतूक सुरू झाल्यावर नागरिकांना प्रवास करणे जिकीरीचे ठरणार असून रस्त्याचे काम करणे अशक्य झाल्यास पुढील सहा महिने नागरिक व प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागेल याबाबत प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.