शिरूर न्यायालयाचा निकाल; अश्लील वर्तन व मारहाण प्रकरणी आरोपींना शिक्षा

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात घडलेल्या अश्लील वर्तन व मारहाण प्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. भारतीय दंड विधान कलम २९४, ३५२, ३४ अंतर्गत दाखल झालेल्या या गुन्ह्याचा निकाल आज (१२ सप्टेंबर) रोजी मे. सी. एम. खारकर सो. यांच्या न्यायालयात लागला.

गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील प्रवीण रामराव गरुड (वय ३८) व रामराव बापूराव गरुड (वय ७१) या दोघांना न्यायालयाने दोषी ठरवत कलम २९४ अंतर्गत प्रत्येकी एक महिन्याची साधी कैद व दोन हजार रुपये दंड, तसेच कलम ३५२ अंतर्गत प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयीन निकालामुळे गावात या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे.या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. सागर वसंतराव कदम व अॅड. ए. बी. शिर्के यांनी सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार ए. जे. जगदाळे यांनी काटेकोरपणे केला होता.

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे (पुणे ग्रामीण) व जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्यांना पोलीस हवालदार तुकाराम गोरे व महिला पोलीस अंमलदार मनीषा फंड यांनी कोर्ट अंमलदार म्हणून साथ दिली. तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक नकाते यांनी भूमिका बजावली.या निकालामुळे कायदा व सुव्यवस्थेवर विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाने गुन्हेगारांना दिलेली शिक्षा ही समाजात अनुकरणीय ठरेल, अशी प्रतिक्रिया परिसरात उमटली आहे.