बेळगाव: सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करून श्रीमंत व्यक्तींना जाळ्यात ओढत लुटणाऱ्या हनीट्रॅप प्रकरणाचा बेळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात फॅशन डिझायनर असलेल्या दीपा अवतगी (वय ३३, रा. महालिंगपूर, जि. बागलकोट) हिला अटक करण्यात आली असून तिचा साथीदार शिवानंद मठपती (रा. हुक्केरी, जि. बेळगाव) हा सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवानंद मठपती हा आधी श्रीमंत व्यक्तींची माहिती गोळा करायचा. ही माहिती तो दीपा अवतगीला देत असे. त्यानंतर दीपा सोशल मीडियावरून त्या व्यक्तींना शोधून काढत त्यांच्याशी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून संपर्क साधत असे. काही दिवस संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर ती त्यांना बेळगाव शहरातील एका लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलवत असे.
लॉजमध्ये आल्यानंतर संबंधित व्यक्तीला आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये पाठवून ती बाहेरून दरवाजा बंद करत असे. त्यानंतर मोबाईल, रोख रक्कम आणि गाडीच्या चाव्या घेऊन ती तेथून पसार होत असे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरून फोन करून पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी मागितली जात होती.
या प्रकाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बेळगाव पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान दीपाच्या काही हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले.
अखेर टिळकवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत दीपाला अटक केली. तिच्याकडून सुमारे ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, फरार आरोपी शिवानंद मठपतीचा शोध पोलिसांकडून सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.