ऍड. चंद्रशेखर आजाद यांच्यावर हल्ला, भीम आर्मीची आज दादरमध्ये निदर्शने

महाराष्ट्र

मुंबई: भीम आर्मीचे संस्थापक ऍड. चंद्रशेखर आजाद यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करून हल्ला केल्याच्या निषेधार्थ भीम आर्मीच्या वतीने आज गुरूवार (दि. २९) जून रोजी दादर पूर्व रेल्वे स्टेशन येथे निदर्शने केली जाणार आहेत.

भीम आर्मी संस्थापक आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख ऍड. चंद्रशेखर आझाद यांच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये देवबंद या ठिकाणी आजाद यांच्या कारवर सायंकाळी हा हल्ला झाला असून कारमधून आलेल्या काहीअज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांच्या कंबरेला एक गोळी घासून गेली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या हल्ल्याचे पडसाद देशासह राज्यभरात उमटले असून राज्यात भीम आर्मीसह विविध संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ऍड. चंद्रशेखर आजाद यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना त्वरीत अटक करण्यासह आजाद यांना व्ही आय पी दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी राज्यभरात निदर्शने आंदोलने सुरू झाली आहेत.

सदर हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत दादर पूर्व स्वामी नारायण मंदीरासमोर आज गुरूवार (दि. २९) जून रोजी दुपारी ३ वाजता निदर्शने करण्यात येणार असून यावेळी शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. भीम आर्मी सह आजाद यांच्यावर प्रेम करणा-या विविध संस्था संघटना व जनतेने यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड यांनी केले आहे