अंबाजोगाईत चिमुरडीवर अत्याचारानंतर मृत्यू; डॉ. नीलम गोऱ्हे यांची कडक कारवाईची मागणी

महाराष्ट्र

मुंबई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे अवघ्या २ वर्षे ५ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनावर कठोर कारवाईसाठी दबाव आणला आहे.

प्राथमिक तपासात मृत्यू अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शवविच्छेदन अहवालातून लैंगिक अत्याचार स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. हा अहवाल सध्या तपासातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरत आहे.या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून, भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची गंभीर दखल घेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत तपास जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच तपास पूर्णपणे पारदर्शक ठेवून सर्व वैद्यकीय व भौतिक पुरावे भक्कमपणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कायद्यानुसार बाल सुधारगृहात ठेवण्याची प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय, पीडित कुटुंबाला समुपदेशन व सुरक्षा देण्याची गरज अधोरेखित करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बालसुरक्षा आणि जनजागृती मोहिमा राबवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.