मुंबई: पंतप्रधान यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री यांनी आज आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यासाठी खासगी विमानाऐवजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने प्रवास केला. ते आज दुपारी ४ वाजताच्या विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना झाले.
दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन अर्बन २.०’च्या विशेष आढावा बैठकीत सहभागी होण्यासाठी शिंदे दिल्लीला गेले आहेत. ही बैठक आज आणि उद्या आयोजित करण्यात आली असून, उद्या ते बैठकीत प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.
मुंबई विमानतळावर शिंदे यांचे अनेक नागरिकांनी स्वागत केले. काहींनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली, तर काहींनी विविध मागण्यांची निवेदने त्यांच्या हाती दिली. सर्वांचे अभिवादन स्वीकारत त्यांनी विमानतळावरून दिल्लीकडे प्रस्थान केले.
जागतिक बाजारपेठेत वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचा संदेश दिला होता. त्यानंतर राज्य सरकारनेही मंत्र्यांसाठी इंधन बचतीबाबत नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ईव्ही वाहनांचा वापर वाढवणे, ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करणे आणि हेलिकॉप्टर दौरे मर्यादित ठेवण्यासारखे निर्णय घेतले आहेत.
आता खासगी विमानाऐवजी प्रवासी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याने शिंदे यांनी इंधन बचतीच्या संदेशाला प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.