१.४७ कोटींचा मुद्देमाल जप्त; २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट, २६ आरोपींवर गुन्हा; १३ जणांना अटक
शिरुर (तेजस फडके) राज्यात कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित जाळ्यावर अन्न व औषध प्रशासनाने निर्णायक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकांनी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत एकाचवेळी नियोजनबद्ध छापे टाकत सुमारे १ कोटी ४७ लाख १३ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट करण्यात आले असून ४९ नमुने संकलित करण्यात आले आहेत.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गुप्त बातमीमुळे कारवाईची सुरुवात…
अन्न व औषध प्रशासनाला कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भेसळ द्रव्यांच्या पुरवठ्याबाबत विश्वसनीय आणि कारवाईयोग्य गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनंतर प्रशासनाच्या गुप्तवार्ता पथकाने विविध स्रोतांद्वारे माहितीची पडताळणी केली. त्यानंतर संपूर्ण रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्यासाठी स्वतंत्र गुप्त तपास सुरु करण्यात आला. या तपासात स्किम्ड मिल्क पावडर, व्हे/डेअरी पर्मिएट पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, पामतेल आदी पदार्थांचा वापर करुन कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे समोर आले. हे मिश्रण नंतर नैसर्गिक दुधात मिसळून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
मंचर परिसरातून सुत्र हलत असल्याचा तपासात उलगडा…
प्रशासनाच्या तपासात सुशांत बबनराव हिंगे, मंचर हा या संपुर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच संदीप लोढा हा या व्यवस्थेत सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचेही समोर आले आहे. या टोळीमार्फत शेतकरी, दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर्स आणि मोठ्या पॅकिंग केंद्रांना भेसळीसाठी आवश्यक द्रव्यांचा नियमित पुरवठा केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कमी खर्चात मोठ्या प्रमाणात नफा मिळविण्यासाठी ही पद्धत वापरली जात होती. त्यामुळे ही कारवाई केवळ एखाद्या आस्थापनेवरची धाड नसून दूध भेसळीच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर केलेला मोठा प्रहार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पाच जिल्ह्यांत एकाचवेळी संयुक्त धाडी…
मुख्य आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकांनी ४ आणि ५ जुलै २०२६ रोजी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे जिल्ह्यांत एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाचे सुमारे ३० अन्न सुरक्षा अधिकारी तसेच ४० पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक पथकाला पूर्वनियोजित लक्ष्य, तपासाची दिशा आणि पुरावे सुरक्षित करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आरोपींना पुरावे नष्ट करण्याची किंवा फरार होण्याची संधी मिळाली नाही.
खालील तेरा ठिकाणी छापे…
या संयुक्त कारवाईदरम्यान दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर्स, भेसळ द्रव्यांचे साठे, पॅकिंग केंद्रे आणि कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली. छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये पुढील आस्थापनांचा समावेश आहे.
१) मे. नवकार डिस्ट्रिब्युटर, अवसरी बुद्रुक, मंचर
२) मे. हेमंत कॉर्पोरेशन, अकलूज
३) मे. पिरसाई मिल्क, आंबेगाव
४) मे. भैरवनाथ, मालवाडी, ता. दौंड
५) मे. जय श्रीराम डेअरी फार्म, पिंपळगाव खडकी, ता. आंबेगाव, पुणे
६) मे. मातोश्री दूध डेअरी, जळगाव सपकाळ, ता. भोकरदन, जि. जालना
७) सोनू उर्फ चैतन्य घोरपडे, पिकअप, ता. माळशिरस, जि. सोलापूर
८) मे. डेलीवेरा ॲग्रो डेअरी, पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर
९) गुरुदत्त दूध शीतकरण केंद्र, कुरुळी, ता. खेड, जि. पुणे
१०) सह्याद्री डेअरी, कवठे यमाई, ता. शिरुर, जि. पुणे
११) आनंदयोगी दूध संकलन, पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर
१२) इंदापूर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स लि., सोनाई चिलिंग सेंटर, पिलीव, ता. माळशिरस
१३) प्रमोद घोरपडे, राहुरी, जि. अहिल्यानगर
या ठिकाणांवरुन कृत्रिम दूध निर्मितीसाठी वापरले जाणारे पदार्थ, उपकरणे, कागदपत्रे, व्यवसायाच्या नोंदी, पुरवठा साखळीशी संबंधित माहिती आणि वैज्ञानिक पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत.
पाच परवाने निलंबित; चार व्यवसाय बंद…
या फौजदारी कारवाईबरोबरच अन्न व औषध प्रशासनाने नियामक पातळीवरही कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणात संबंधित पाच अन्न व्यवसाय परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले असून चार आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील तपास, प्रयोगशाळा अहवाल आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार आणखी कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांचे विशेष सहकार्य…
या संपुर्ण कारवाईत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महत्त्वाची भूमिका बजावली. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभागातील समन्वयामुळे अनेक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकणे, आरोपींना ताब्यात घेणे, पुरावे सुरक्षित करणे आणि गुन्हा नोंदविणे ही प्रक्रिया प्रभावीपणे पार पडली.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना इशारा…
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाईबाबत सांगितले की, दूध हा प्रत्येक कुटुंबातील लहान मुले, गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. अशा जीवनावश्यक अन्नपदार्थात भेसळ करणे हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजाविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांविरुद्ध कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
राज्यभर गुप्तवार्तेवर आधारित विशेष मोहीम…
या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व विभागीय सहआयुक्त, सहायक आयुक्त, अभिहित अधिकारी आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना गुप्तवार्तेवर आधारित तपास अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर्स, प्रक्रिया उद्योग, वाहतूक व्यवस्था, गोदामे, भेसळ द्रव्यांचा पुरवठा करणारे घटक आणि आर्थिक व्यवहार यांचे विश्लेषण करून (Intelligence-led Enforcement) अधिक व्यापक केले जाणार आहे.
नागरिकांना आवाहन…
राज्यातील नागरिकांनी दूध किंवा इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ अन्न व औषध प्रशासनाला कळवावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि प्राप्त माहितीची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे, भेसळीसाठी रासायनिक पदार्थांची खरेदी-विक्री करणे, साठवणूक, वाहतूक, वितरण किंवा विक्रीमध्ये सहभाग घेणे हे कायद्याने गंभीर गुन्हे आहेत. सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.