अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

महाराष्ट्र

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवत महामंडळावरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. थेट निवडणुकीसाठी झालेल्या १४ जागांपैकी सर्व १४ जागांवर समर्थ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी चित्रकर्मी पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही.

महामंडळाच्या एकूण १७ जागांपैकी तीन जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १४ जागांसाठी झालेल्या मतदानात सभासदांनी समर्थ पॅनेलच्या बाजूने स्पष्ट कौल दिला.निर्माता विभागातून मेघराज राजेभोसले आणि सुनील महाजन, दिग्दर्शक विभागातून दीपक कदम आणि अजित शिरोळे, लेखक विभागातून राज काजी, अभिनेता विभागातून सुशांत शेलार यांच्यासह विविध विभागांतील उमेदवारांनी विजय मिळवला.

दरम्यान, अभिनेत्री विभागातून वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड झाली. तसेच संकलक विभागातून विजय खोचीकर आणि संगीत विभागातून आनंद शिंदे हेही बिनविरोध निवडून आले.या निकालामुळे मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले असून पुढील पाच वर्षांसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची धुरा समर्थ पॅनेलकडेच राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत